सोमवारी निवडणूक आयोगाने पाच राज्यामधील निवडणुकांची घोषणा केली. मिझोराम, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यात 7 ते 30 नोव्हेंबरपर्यंत मतदान होईल. तीन डिसेंबरला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकानंतर सुमारे सहा महिन्यात लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजेल. नरेंद्र मोदी व भाजपाची स्पष्ट बहुमताची सत्ता केंद्रात राहणार का या प्रश्नाचे उत्तर मिळेल. म्हणूनच या निवडणुकांना लिटमस चाचणी किंवा सेमीफायनल समजले जात आहे. भाजपाची राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि सर्व विरोधी पक्षाची इंडिया आघाडी या सेमीफायनलमध्ये लोकमताचा कौल कसा मिळवते यावर आगामी राजकारणाची भिस्त अवलंबून असल्याने या निवडणुकांना अनन्य साधारण महत्त्व आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करण्यापूर्वीच भाजप, काँग्रेससह काही पक्षांनी या निवडणुकांची तयारी आरंभली होती. बारा महिने तेरा काळ राजकारणाचा सर्वसामान्यांना उबग आला आहे. पण, सत्ता मिळवणे, राखणे यासाठी हा खेळ अनिवार्य आहे. काही ठिकाणी काही पक्षांनी उमेदवारही घोषित केले आहेत. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच काहींनी आपणास व आपल्या पक्षास अनुकुल पावले टाकली आहेत. इंडिया आघाडीमुळे भाजपाला सत्ता गमवावी लागेल, असा होरा शरद पवार, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, लालूप्रसाद यादव वगैरेंचा आहे. पण, मोदी शहा यांना आपण अधिक संख्येने विजयी होऊ असा विश्वास आहे. इंडिया आघाडीतील नेते देशासाठी, राज्यासाठी, लोकांसाठी एकत्र आलेले नाहीत. घराणेशाहीसाठी मुला, नातवांच्या सत्तेसाठी एकत्र आले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी देशासाठी, भारतासाठी लढते आहे असा भाजपाचा प्रमुख प्रचारमुद्दा आहे. पण,कर्नाटक विजयानंतर आणि भारत पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद यामुळे काँग्रेस आणि मित्रपक्ष मोठ्या अपेक्षा बाळगून आहेत. निवडणूक घोषणा होण्याच्या दरम्यान ज्या मतदान चाचण्या झाल्या आहेत त्यामध्ये मिझोराममध्ये त्रिशंकु विधानसभा होईल असा अंदाज आहे. येथे सत्तेत एमएनएफ हा स्थानिक प्रादेशिक पक्ष आहे. मणिपूरमधील हिंसाचाराचे प्रतिबिंब मिझोराममध्ये प्रचारमुद्दा होईल असे मानले जाते. एकूण 40 जागा व साडेआठ लाख मतदार आहेत. आपल्याकडे कोणत्याही मध्यम आकाराच्या महापालिकेसारखी ही निवडणूक आहे. तेथे एमएनएफ व काँग्रेस हे लढतीतील प्रमुख पक्ष आहेत. पण, यावेळी मतदार चाचणी अहवालाप्रमाणे त्रिशंकु अवस्था झाली तर झेडपीएम मोठा रोल निभावू शकतो. ओपिनियन पोलनुसार मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट 13 ते 17 जागा जिंकेल. काँग्रेस 10 ते 14, झेडपीएम 9 ते 13 आणि अन्य एक ते तीन जागा जिंकेल. कुकी नागा समुदायाचे जमिनीचे प्रश्न विघटनवादी शक्ती व त्यांना मिळणारा धार्मिक आधार या पार्श्वभूमीवर भाजपा आघाडीतील मिझो नॅशनल फ्रंट जादुई 21 आकडा गाठणार का हा प्रश्न आहे. दुसरे राज्य मध्यप्रदेशमध्ये 230 जागांवर निवडणूक होत आहे. तेथे सुमारे साडेपाच कोटी मतदार आहेत. शिवराज चौहान यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार सत्तारूढ आहे. शिवराज यांनी मुली व महिलांसाठी चांगल्या योजना राबवल्या आहेत. तेथे त्यांची मामा नावाने ओळख निर्माण झाली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया भाजपासोबत आहेत. गत निवडणुकीत काँग्रेसला 114 जागा व भाजपाला 109 जागा मिळाल्या होत्या. भाजपाने फोडाफोडी करून तेथे सत्ता मिळवली होती. यंदाच्या निवडणुकीत ओपिनियन पोलनुसार काँग्रेस 113 ते 125 भाजपाला 104 ते 116 व अन्य चार असा कौल दिसतो आहे. काँग्रेस तेथे सत्ता मिळवेल असा अंदाज असला तरी शहा मोदी जोडी तेथे मतमोजणीनंतर काहीही करू शकते. काठावरचे बहुमत मोडून काढण्यात भाजपा तरबेज आहे. सिंधिया प्रभावाने जादुई आकडा पार झाला तर ज्योतिरादित्य सिंधिया मुख्यमंत्री होऊ शकतात. चौहान यांना केंद्रात घेतले जाऊ शकते. तिसरे राज्य तेलंगणात बीआरएस (भारत राष्ट्र समिती) 88 जागा जिंकून सत्तेत आहे. काँग्रेसकडे 19 तर भाजपाला केवळ एक जागा एकूण 119 जागा व सुमारे तीन कोटी 17 लाख मतदार आहेत. के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रासह अन्य राज्यात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. ओपिनियन पोलनुसार 119 पैकी बीआरएसला 43 ते 55, काँग्रेसला 48 ते 60, भाजपला 5 ते 11 व अन्य 5 ते 11 असा कौल दिसतो आहे. ओघानेच तेथे काँग्रेस आणि बीआरएस यांच्यात काटे की टक्कर आहे. चौथे राज्य छत्तीसगढ तेथे 90 जागा व सव्वा दोन कोटी मतदार आहेत. काँग्रेसचे भुपेंद्र बघेल मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसला येथे सत्ता राखू असा विश्वास आहे. ओपिनियन पोलनुसार छत्तीसगढमध्ये 90 पैकी काँग्रेसला 45 ते 51, भाजपाला 39 ते 45 व इतरांना दोन जागा मिळतील. याचा अर्थ तेथे काँग्रेसची सत्ता कायम राहिल असा आहे. शेवटचे पाचवे राज्य राजस्थान हे मध्यप्रदेश इतकेच महत्त्वाचे आहे. तेथे विधानसभेच्या 200 जागा आहेत. सव्वा पाच कोटी मतदार आहेत. काँग्रेसचे अशोक गेहलोत मुख्यमंत्री आहेत. तेथे गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील संघर्ष जोरात आहे. कायम आलटून पालटून कौल मिळतो असा इतिहास आहे. ओपिनियन पोलनुसार 200 पैकी भाजपा तेथे 127 ते 137 जागांसह प्रथम क्रमांकावर तर काँग्रेस 59 ते 69 व अन्य दोन ते सहा जागा मिळवेल असे दिसते आहे. भाजपाची एकतर्फी लाट दिसते आहे. या पाच राज्याचा ताजा सर्व्हे असा असला तरी मतदानापर्यंत अनेक बदल होऊ शकतात. काँग्रेस कर्नाटक पॅटर्न राबवणार हे उघड आहे. मुख्य मुद्दा घराणेशाही की राष्ट्रवाद हा राहील. त्यामुळे या पाच राज्यातून विविध पक्षाची तयारी इंडिया आघाडीची एकजूट आणि भाजपाची दिशा स्पष्ट होईल. पण, हुशार मतदार प्रसंग पाहून मतदान करतात हे अनेकवेळा दिसून आले आहे. देशभर एकसाथ सर्व निवडणुका तूर्त नाहीत असेही दिसते आहे. भाजपापुढे शतप्रतिशत इंडिया आघाडीचे आव्हान असेल तर इंडिया आघाडीपुढे मोदींना भाजपाला सत्तेवरून खाली खेचणे हा अग्रक्रम असेल. मतदार राजा काय करतो ते दिसेल. दसरा झाला की युद्धावर जाण्याची पूर्वी परंपरा असे आता निवडणूक रणवाद्ये वाजतील आणि कोण किती पाण्यात आहे, लोकांच्या मनात काय आहे हे स्पष्ट होईल.








