फिफा महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा : बुधवारी दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलिया इंग्लंडला भिडणार
वृत्तसंस्था /सिडनी
फिफा महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीपासून स्पेन फक्त एक विजय इतका दूर असून ऑकलंडच्या ईडन पार्क येथे मंगळवारी होणार असलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत हा संघ स्वीडनशी भिडणार आहे. डझनभराहून अधिक खेळाडू बंडखोरी करून संघापासून दूर गेल्यानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत स्पेननी ही झेप घेतली आहे. दुसरीकडे, सिडनी येथे बुधवारी होणार असलेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये एक नवीन झुंज पाहायला मिळणार आहे.
स्पेन तिसऱ्यांदा या स्पर्धेत खेळत असून यावेळच्या इतकी मजल त्यांनी कधीच मारली नव्हती. चार वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये त्यांनी बाद फेरी गाठली होती, परंतु पुढे विजेत्या ठरलेल्या अमेरिकेने त्यांचे आव्हान संपुष्टात आणले होते. यापूर्वी स्पेन एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत 1997 मध्ये पोहोचला होता. त्यावेळी ‘युरो’च्या अंतिम चार संघांत त्यांनी स्थान मिळविले होते. विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत 2019 च्या उपविजेत्या नेदरलँड्सवर अतिरिक्त वेळेत 2-1 ने विजय मिळवून स्पेनने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलेले आहे. गेल्या जुलैमध्ये युरोपियन स्पर्धेच्या किंचित आधी स्नायूच्या दुखापतीतून सावरलेली दोन वेळची बॅलोन डी’ओर विजेती अॅलेक्सिया पुटेलास ही त्यात बदली खेळाडू म्हणून पुन्हा एकदा झळकली. स्पेनतर्फे 102 सामन्यांमध्ये 28 गोल करणारी पुटेलास ही जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक मानल जातो. स्पेन ‘फिफा’च्या जागतिक क्रमवारीत 6 व्या स्थानावर असून गेल्या वर्षी खेळाडूंच्या बाबतीत संघर्षमय परिस्थिती पाहायला मिळूनही त्यांच्याकडे चषकाच्या दमदार दावेदारांपैकी एक म्हणून पाहिले गेले आहे. जेनिफर हर्मोसो, आयताना बोनमाती आणि अल्बा रेडोंडो या प्रत्येकी तीन गोल करत आघाडीवर राहिल्या आहेत.
दुसरीकडे, स्वीडनने उपांत्यपूर्व फेरीत जपानला 2-1 ने पराभूत करून आगेकूच केलेली आहे. जपानने 2011 च्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. त्याआधी त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत दोनवेळच्या विजेत्या अमेरिकेला पेनल्टीवर नमविले होते. 2003 मधील विश्वचषक स्पर्धेत स्वीडिश संघ उपविजेता ठरला होता आणि तीन वेळा त्यांनी तिसरे स्थान मिळवलेले आहे. परंतु या स्पर्धेचा किताब त्यांना कधीही जिंकता आलेला नाही. दोन वर्षांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत स्वीडनला कॅनडाकडून पराभूत व्हावे लागले होते. स्वीडनचे प्रशिक्षक पीटर गेर्हार्डसन यांनी सांगितल्यानुसार, त्यांची आघाडीपटू सोफिया जेकोबसनमध्ये आजाराची सौम्य लक्षणे दिसून आलेली असली, तरी ती सामन्यासाठी उपलब्ध होण्याची आशा आहे. महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि स्वीडन यापूर्वी कधीच समोरासमोर आलेले नाहीत. स्पॅनिश संघ तर पहिल्या सहा स्पर्धांसाठी पात्रही ठरला नव्हता. गेल्या ऑक्टोबरमध्ये कॉर्दोबा, स्पेन येथे या दोन संघांमध्ये झालेला मैत्रीपूर्ण सामना 1-1 असा बरोबरीत राहिला होता.
दुसरीकडे, सहयजमान ऑस्ट्रेलियाची ही विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळण्याची पहिलीच खेप आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा त्यांना लाभेल. सदर स्टेडियमवर सुमारे 80 हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. शनिवारी उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सविऊद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने मिळविलेला विजय हा ऑस्ट्रेलियात जवळपास मागील दोन दशकांत टीव्हीवर सर्वाधिक प्रमाणात पाहिल्या गेलेल्या क्रीडा सामन्यांपैकी एक राहिला आहे. पण इंग्लंडचा संघ हा युरोपियन विजेता आहे आणि जरी त्यांना प्रतिकूल प्रेक्षकांचा सामना करावा लागला, तरी प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने त्यांचे पारडे सध्या तरी भारी वाटत आहे. इंग्लंडची कर्णधार मिली ब्राइटने दोन्ही देशांच्या चाहत्यांसाठी ही लढत किती महत्त्वपूर्ण आहे ते आपल्याला माहीत आहे, असे म्हटले आहे. इंग्लंड संघ पुन्हा एकदा बंदी घातलेल्या लॉरेन जेम्सशिवाय उतरणार असला, तरी कोलंबियाविऊद्धच्या सामन्यात त्यांना तिची उणीव भासली नव्हती. फिफा क्रमवारीत इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियापेक्षा सहा स्थानांनी वर असला, तरी यजमान संघाने देशातील रसिकांमधील जबरदस्त उत्साहाच्या जोरावर चांगल्या कामगिरीचा धडाका लावलेला आहे. त्यातच पोटरीच्या दुखापतीतून सावरलेली ऑस्ट्रेलियाची आघाडीपटू आणि कर्णधार सॅम केर देखील फॉर्मात आली आहे.