वृत्तसंस्था/ लंडन
प्रीमियर लीग 12 एप्रिलपासून सेमी-ऑटोमेटेड ऑफसाईड तंत्रज्ञानाचा वापर सुरू करणार असून तशी घोषणा लीगने केली आहे. एफए कपमधून इंग्लिश इंग्रजी फुटबॉलमध्ये पदार्पण झालेले हे तंत्रज्ञान ‘ऑफसाइड’चा निर्णय घेण्याच्या बाबतीत वेग, कार्यक्षमता, सातत्य वाढविण्याच्या दृष्टीने आखलेले आहे, असे लीगने एका निवेदनात म्हटले आहे.
सदर तंत्रज्ञान ऑप्टिकल प्लेअर ट्रॅकिंग वापरून व्हर्च्युअल ऑफसाइड लाइनचे अधिक कार्यक्षम चित्र प्रदान करते आणि चाहत्यांसाठी स्टेडियममध्ये तसेच प्रक्षेपण पाहणाऱ्या रसिकांसाठी व्हर्च्युअल ग्राफिक्स सादर करते, असे लीगच्या निवेदनात म्हटले आहे. एफए कपच्या व्यतिरिक्त प्रीमियर लीगमध्ये या तंत्रज्ञानाची ‘नॉन-लाइव्ह’ चाचणी देखील झालेली आहे. लीगने म्हटले आहे की, त्यांनी ही व्यवस्था विकसित करण्यासाठी पंच आणि जीनियस स्पोर्ट्ससमवेत काम केले आहे.









