रील्स बनविण्याचा संकल्प : दोन लाखांना व्यवहार : मातेसह चौघे अटकेत
वृत्तसंस्था /कोलकाता
पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका मातेला रील्स बनवण्याचे इतके व्यसन लागले की तिने स्वत:च्या पोटच्या मुलाची विक्री केल्याचे उघड झाले. आपला छंद पूर्ण करण्यासाठी तिने आयफोन-14 खरेदी केला. मात्र, आपला संकल्प साकारण्यासाठी तिने 8 महिन्यांच्या मुलाला विकल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मुलाची आई आणि मुलाला विकत घेतलेल्या महिलेसह चार जणांना अटक केली आहे. त्याचे वडील फरार झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दोन लाख ऊपयांना मुलाच्या विक्रीचा व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
पश्चिम बंगालमधील या घटनेने कोणत्याही सुजाण नागरिकाला धक्का बसल्यावाचून राहवणार नाही. येथील एका जोडप्याने कथितरित्या इन्स्टाग्राम रील्स बनवण्यासाठी आयफोन-14 खरेदी करण्यासाठी आपल्या 8 महिन्यांच्या बाळाला विकले. उत्तर 24 परगणा येथील पानिहाती येथील गांधीनगर भागात राहणारे जयदेव घोष आणि त्यांची पत्नी साथी घोष यांच्यावर आयफोन खरेदी करण्यासाठी आपल्या 8 महिन्यांच्या बाळाला विकल्याचा आरोप आहे. गेल्या शनिवारपासून घोष दाम्पत्याचा मुलगा बेपत्ता असतानाच त्यांच्याकडे नवीन आयफोन आल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. मुलाची शोधाशोध किंवा त्यासंबंधी पोलिसात तक्रार करण्याऐवजी हे दाम्पत्य रील्स बनवण्यातच व्यस्त असल्याचे पाहून लोकांचा संशय बळावला. त्यानंतर शेजाऱ्यांनी वारंवार विचारणा केल्यावर या जोडप्याने आपला मुलगा आयफोनसाठी विकल्याचे सांगितले. शेजाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी आई आणि साथीदाराला अटक केली. यासोबतच मुलाला विकत घेणाऱ्या प्रियांका नावाच्या महिलेलाही अटक करण्यात आली आहे. मुलाची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी आईसह चार जणांना अटक केली आहे.









