खोची,वार्ताहर
साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या ऊसाला चांगला दर देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल, तर त्यासाठी शासनाने एमएसपी (किमान साखर विक्री किंमत) वाढवणे गरजेचे आहे. शासन शेती खर्च वाढतो आहे म्हणून एफआरपीमध्ये वाढ करीत आहे. पण सर्व धान्यांचे दर वाढले आहेत पण साखरेचा दर वाढलेला नाही. साखरेचा विक्री दर किमान ३५०० रुपये क्विंटल केला पाहिजे व निर्यात बंदी उठवली पाहिजे. असे मत माजी मंत्री व शरद साखर कारखान्याचे चेअरमन आ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी व्यक्त केले. गत हंगामात ऊसाला एफआरपी नुसार प्रति टन २८४४ रुपये दर मिळत होता. पण शरद साखर कारखान्याच्या सगळीकडे काटकसरीच्या भूमिकेने २९०० रुपये दर देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे सांगितले.
ते नरंदे ता.हातकणंगले येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्हा.चेअरमन थबा कांबळे, संजय पाटील-यड्रावकर,आदित्य पाटील-यड्रावकर,नरंदे सरपंच पूजा कुरणे,अरुण पाटील,अभिजीत भंडारी, अजय पाटील-यड्रावकर,डी.बी.पिष्टे, डॉ.सनतकुमार खोत,प्रा.बी.के.चव्हाण आदी उपस्थित होते.प्रारंभी कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी शामराव पाटील-यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नोटीस व विषय वाचन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए.आवटी यांनी केले. सभासदांनी विषय पत्रिकेतील सर्व विषय एकमताने मंजूर केले.यावेळी देशातील दिवंगत थोर मान्यवर व मयत सभासद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.संजय नांदणे यांनी हा ठराव मांडला.स्वागत संचालक रावसाहेब भिलवडे यांनी केले.तर आभार संचालक सुभाषसिंग रजपूत यांनी मानले.सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले.यावेळी विविध ठिकाणी निवड झालेल्या व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.तसेच कारखान्याचे दोन मयत कर्मचारी यांच्या वारसांना सात लाख २४ हजार ५९८ रुपये प्रत्येकी धनादेश प्रदान करण्यात आला.
यड्रावकर पुढे म्हणाले,शरद साखर कारखान्याची निर्मिती ही कै.शामराव पाटील-यड्रावकर यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचे हेतूने केली आहे.प्रथम २५०० मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या कारखान्याची क्षमता ५०००मेट्रिक टन आहे.कारखान्याने प्रत्येक कर्जाची हप्ते वेळेत भरले असून प्रत्येकाची देणी वेळेत दिली आहेत.को-जनरेशन मधून १५७.४२ लाख युनिट महावितरणला वीज पुरवठा केला आहे.मात्र महावितरण कडून कारखान्यासाठी वीज दरवाढ होणे गरजेचे आहे.डिसलरी प्रकल्प सुरू करून त्यामधून चांगले उत्पादन घेतले असून प्रकल्पाच्या कर्जाचे हप्ते पूर्ण केले आहेत.आगामी हंगामात उसाची परिस्थिती चिंताजनक असून सर्व सभासदांचा ऊस गाळपासाठी कारखान्याला येणे गरजेचे आहे. कारखाना सभासदांच्या हितासाठी कायम कटिबद्ध असून विविध घोषणा योजना राबवत आहे.
सभेस संचालक आप्पासो चौगुले, लक्ष्मण चौगुले,अजित उपाध्ये,पोपट भोकरे,अन्य संचालक लाटवडे सरपंच संभाजी पवार,प्रा.अण्णासाहेब क्वाणे, चंद्रकांत जोग,धनपाल आगाशे, संभाजी गोते आदीसह हातकणंगले- शिरोळ तालुक्यातील सभासद, कार्यकर्ते,कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सामान्य शेतकरी मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी सगळ्या सोयी, आधुनिकता आणणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षणाचे विविध पदवी कोर्स आणून त्यांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न करीत आहोत,असे यड्रावकर यांनी सांगितले.









