पृथ्वी-चंद्राची छायाचित्रे कॅमेराबद्ध : अवकाशयान सध्या पृथ्वीच्या कक्षेत
वृत्तसंस्था /बेंगळूर
सूर्ययान ‘आदित्य-एल1’बाबत देशवासियांसाठी अवकाशातून एक आनंदाची बातमी आली आहे. सूर्य मोहिमेंतर्गत सूर्याकडे सतत फिरणाऱ्या भारताच्या ‘आदित्य-एल1’ने अवकाशातून पृथ्वी आणि चंद्राची छायाचित्रे घेतली आहेत. ‘आदित्य-एल1’ने अंतराळात आपला पहिला सेल्फी घेतला आहे. इतकेच नाही तर पृथ्वी आणि चंद्राचीही दूरवरून छायाचित्रे कॅमेराबद्ध केल्याचे गुरुवारी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) स्पष्ट केले आहे. इस्रोने यासंबंधी एक व्हिडिओही जारी केला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘आदित्य-एल1’ ही पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या एल-1 बिंदूवरून सूर्याच्या बाह्या वातावरणाचा अभ्यास करणारी पहिली भारतीय अवकाश-आधारित वेधशाळा आहे. इस्रोच्या पीएसएलव्ही-सी57 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाने 2 सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून ‘आदित्य-एल1’चे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहाची पहिली परिभ्रमण प्रक्रिया 3 सप्टेंबर रोजी यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर 5 सप्टेंबरला दुसरी कक्षाही पूर्ण केली आहे. एल-1 च्या दिशेने हस्तांतरण कक्षेत प्रवेश करण्यापूर्वी ‘आदित्य-एल1’ला आणखी दोन परिभ्रमण प्रक्रियेतून जावे लागेल. हा उपग्रह अंदाजे 127 दिवसांनी एल-1 बिंदूवर इच्छित कक्षेत पोहोचण्याची शक्मयता आहे. निर्धारित स्थळी पोहोचल्यानंतर भारतीय उपग्रह सूर्याच्या विविध स्थितींचा अभ्यास करणार आहे. तेथील तापमान आणि सौरस्थितीचे वेळोवेळचे अपडेट्स इस्रोला ‘आदित्य-एल1’कडून पुरविले जाणार आहेत.









