मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे ओल्ड गोवा येथे प्रतिपादन : राज्यस्तरीय महात्मा गांधी-लालबहादूर शास्त्री जयंती
प्रतिनिधी /पणजी
महात्मा गांधीजींच्या ग्राम स्वराज्य संकल्पनेच्या आधारेच स्वयंपूर्ण गोवा योजना सुरु पेल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांनी सांगितले. येणाऱया काळात गोवा आणि गोव्यातील नागरिक स्वावलंभी होतील, अशी आशाही डॉ. सावंत यांनी व्यक्त केली आहे.
महात्मा गांधीजी व लालबहादूर शांस्त्री जयंतीनिमित्त काल रविवारी ओल्ड गोवा येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.
यावेळी त्यांच्या सोबत केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, सांताक्रूजचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, माजीमंत्री निर्मला सावंत, माजी आमदार धर्मा चोडणकर, ओल्ड गोवाच्या सरपंच सँड्रा गोन्साल्विस व अन्य मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी गांधीजींच्या पुतळ्याला तसेच लालबहादूर शास्त्रींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली.
स्वयंपूर्ण गोव्यासाठी स्वयंपूर्ण मित्र
स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमांतर्गत राज्य सरकारने काही सरकारी अधिकाऱयांची स्वयंपूर्ण मित्र म्हणून नियुक्ती केली आहे. प्रत्येक स्वयंपूर्ण मित्र ग्राम पंचायत तसेच नगरपालिकांना भेटी देतो. तेथील लोकांसोबत संवाद साधून सरकारच्या विविध योजनांबाबत माहिती त्यांना देतो. राज्यातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून त्यांच्यापर्यंत सरकारची प्रत्येक सवलत आणि योजना पोचविण्यासाठी कार्य करत आहे. सर्वसामान्य नागरिकालाही सुखी, समृध्द जीवन जगता यावे यासाठी महात्मा गांधीजींनी ग्राम स्वराज्य योजना तयार केली होती, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नवभारत निर्मितीसाठी योगदान द्यावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ हे ध्येय ठेवले आहे. महात्मा गांधीजीनी स्वच्छतेचा नारा दिला होता, त्याच धरतीवर स्वच्छ भारतचे ध्येय आहे. गांधीजींच्या ग्राम स्वराज्य संकल्पनेतून 2 ऑक्टोबर 2020 रोजी गोवा सरकारने स्वयंपूर्ण गोवा ध्येय ठेवले आहे. गोवा सरकार आपल्या ध्येयावर राज्यातील प्रत्येक पंचातीत काम करीत आहे. येणाऱया काळात गोवा स्वयंपूर्ण होईल, यात शंकाच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील नवभारताच्या निर्माणासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असेही डॉ. सावंत म्हणाले.









