जगात आज आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अशा तिन्ही आघाड्यांवर अस्थिरतेचे वातावरण आहे. कोणताही देश स्वत:चा लाभ साधल्याखेरीज दुसऱ्या देशाच्या साहाय्याला धावून येण्याची स्थिती राहिलेली नाही. वास्तविक, अशी आदर्श स्थिती पूर्वीही विशेष प्रमाणात नव्हतीच. तरीही, भू-राजकीय समतोल साधण्यासाठी, आर्थिक लाभाच्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार करण्याची प्रवृत्ती होती. गेल्या आठ-दहा महिन्यात हे सर्व संदर्भ झपाट्याने पालटले आहेत. यामुळे भारतासारख्या विकसनशील देशांनाही त्यांचे सामर्थ्य वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. उशीरा का असेना, पण भारताने हे लक्षात घेतले आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने ठोस पावले टाकायला प्रारंभ केला, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. भारताच्या वायुदलाने भारताच्याच सार्वजनिक क्षेत्रातील हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड या विमानांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीशी 62 हजार कोटी रुपयांचा करार 97 आधुनिक तेजस युद्ध विमानांच्या खरेदीसाठी केला आहे. त्याचप्रमाणे चालत्या रेल्वेतून डागता येईल, अशा ‘अग्नी’ क्षेपणास्त्राची निर्मितीही यशस्वी करुन दाखविली आहे. या दोन्ही घटना संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने नेणाऱ्या आहेत. भारत हा भूभाग आणि लोकसंख्या या दोन्ही दृष्टींनी एक मोठा देश आहे. साहजिकच, भारताची ‘प्रज्ञासंपन्नता’ किंवा ‘टॅलेंट पूल’ही मोठी आहे. आजवर भारताची ही ‘प्रज्ञा’ स्वत:साठी अमेरिका किंवा इतर विकसित आणि बलाढ्या देशांमध्ये संधी शोधत होती. तशी संधी मिळतही होती. भारतात जन्मायचे, शिकायचे आणि अमेरिका किंवा तत्सम देशांमध्ये नोकरी करायची. शक्यतर त्या देशांचे नागरिकत्व मिळविण्याचा प्रयत्न करायचा, हे ध्येय अनेक प्रज्ञावंतांचे होते आणि आजही आहे. अर्थात, ही त्यांचीच चूक आहे, असे म्हणता येणार नाही. कारण भारतातले वातावरणही तशाच प्रकारचे आहे. येथे केवळ बुद्धी किंवा वैज्ञानिक नवनिर्मितीची क्षमता, शास्त्रीय संशोधन तसेच तंत्रवैज्ञानिक शोधकार्य यांना विशेष प्रतिष्ठा आणि संधी स्वातंत्र्यानंतरच्या काळात कधीच विशेषत्वाने उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. स्वातंत्र्यानंतर, इतर क्षेत्रांमध्ये भारताची प्रगती होत असताना, तंत्रवैज्ञानिक क्षेत्रात आपण विकसित देशांच्या पुष्कळच मागे पडलो. कारण आपल्याकडे प्रत्येक मुद्द्याचा विचार राजकीय नफा-तोट्याच्या दृष्टीनेच केला जातो. त्यामुळे जे त्यामानाने सोपे आणि राजकीयदृष्ट्या त्वरित लाभ मिळवून देणारे असेल, त्यालाच प्राधान्य द्यायचे ही इथल्या आजवरच्या धोरणकर्त्यांची कार्यपद्धती आणि विचारसरणी होती. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्र हे असे क्षेत्र नव्हे. या क्षेत्रात चार ते पाच दशके, म्हणजेच दीड ते दोन पिढ्या कष्ट केले जात नाहीत, तो पर्यंत यश मिळण्याची शाश्वती नसते. या क्षेत्रात प्रगती करुन जगावर प्रभाव टाकायचा असेल, तर धोरण सातत्य आणि कष्टसातत्य यांची आवश्यकता असते. राजकारणाच्या लहरीप्रमाणे पुढे मागे करता येण्यासारखे हे क्षेत्र नाही. शिवाय, विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती करायची, तर प्रारंभी मोठी आर्थिक गुंतवणूकही करावी लागते. केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही. याचाच अर्थ असा की, या क्षेत्रात जागतिक ख्याती मिळविण्यासाठी प्रतिभासंपन्नता, पैसा आणि वेळ या तिन्ही बाबींची गुंतवणूक करावी लागते. इतके कष्ट उठविण्याची इच्छाशक्ती स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुढची 65 ते 70 वर्षे कोणत्याही सत्ताधारी पक्षाने, किंवा खासगी कंपन्यांनीही आपल्याकडे दाखविलेली नाही. स्वबळावर तंत्रज्ञान विकसित करण्याऐवजी त्यापासून निर्माण होणाऱ्या विदेशी वस्तू विकत घेण्यातच आपला पराक्रम आहे. ही वृत्ती केवळ संरक्षण साधनांपुरतीच मर्यादित नाही. मोटारगाड्या, दुचाकी, टीव्ही, फ्रिज, मोबाईल, संगणक, इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा दैनंदिन उपयोगाच्या आणि अत्याधुनिक गुणवत्तेच्या वस्तू आपण परदेशातून आयात करतो. इथे त्यांचा उपभोग घेतो आणि निर्यातदार देशांच्या संपत्तीत भर टाकतो. यालाच आपण आपल्या देशाची ‘प्रगती’ हे गोंडस नाव देऊन स्वत:ची फसवणूक करुन घेण्यात धन्यता मानली आहे. अशा वस्तू स्वत:च्या देशात निर्माण कराव्यात. निदान तसा प्रयत्न करावा, असे आपल्याकडे ‘विज्ञाननिष्ठ आणि पुरोगामी’ म्हणवून घेणाऱ्यांनाही वाटत नाही, हे आश्चर्य आहे. आपल्याकडची विज्ञाननिष्ठा आणि पुरोगामित्व हे केवळ धर्म (त्यातही हिंदू धर्म) कसा वाईट आणि मागास, हे हे सिद्ध करण्यातच धन्यता मानणारी आहे. पण त्यापलीकडे जाऊन विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी वेगळे कष्ट करावे लागतात, याची जाण आपल्या पुरोगाम्यांना किंवा विज्ञाननिष्ठांना आहे, असे दिसून येत नाही. म्हणूनच आपल्याकडे ‘तोंडी विज्ञाननिष्ठ’ पुष्कळ आहेत, पण ‘खरेखुरे वैज्ञानिक’ खूपच कमी आहेत, असे दिसते. जे आहेत, त्यांनाही संधी आणि साधने कितपत मिळतात, हा भाग पुन्हा वेगळाच आहे. अशाच प्रकारची ‘इकोसिस्टिम’ आपल्या धोरणकर्त्यांनी बनविली असेल तर मग अशा टॅलेंटने विदेशात संधी शोधली, तर ते चूक कसे म्हणावे? पण या नकारात्मक पूर्वसंचिताचे दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत. जगाच्या व्यवस्थेत वेगाने परिवर्तन होत असताना, आपण हे परिवर्तन रोखूही शकत नाही आणि त्याच्याशी जुळवूनही घेऊ शकत नाही. आपली तंत्रवैज्ञानिक प्रगती म्हणावी तशी झाली नाही, हेच याचे प्रमुख कारण आहे. गेल्या आठ दशकांमध्ये भारतात कोणताही असा तंत्रवैज्ञानिक ‘ब्रँड’ निर्माण झालेला नाही, की ज्यावर जग अवलंबून असेल. यामुळेच आपण कोणावरही ‘दबाव’ टाकू शकत नाही. वारा येईल तशी पाठ फिरवणे आणि स्वत:चे अस्तित्व राखणे, एवढेच आपल्या हाती आहे. सुदैवाने, गेल्या आठ दहा वर्षांमध्ये आपल्या राज्यकर्त्यांना याची जाणीव झाल्याचे दिसून येते. आत्मनिर्भरतेच्या दिशेने काही पावले पडल्याचेही पहावयास मिळते. नुकत्याच झालेल्या ‘सिंदूर अभियाना’त भारत निर्मित शस्त्रास्त्रांनी जी कामगिरी केली त्यातून हे सिद्ध होत आहे. याच मार्गाने आपल्याला पुढे जावे लागणार आहे. जगाला शिव्या देत बसणे किंवा जगावर अवलंबून राहणे, यापेक्षा स्वत:चे बळ स्वकष्टाने वाढविणे, यातच खरा ‘पुरुषार्थ’ आहे, हे जाणावे लागणार आहे. आज जरी याचा गांभीर्याने प्रारंभ केला, तरीही पुढच्या काही वर्षांमध्ये हे साध्य होऊ शकेल, एवढे टॅलेंट आपल्याकडे निश्चित आहे.
Previous Articleगणतीमागे राजकीय गणित ?
Next Article एच वन बी व्हिसा संकट?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








