अध्याय पहिला
बाप्पा राजाला म्हणाले, समोर दिसत असलेल्या सर्व गोष्टी ही सगळी माझीच रूपे आहेत. त्यांच्यात माझेच आत्मतत्व भरलेले असल्याने सगळ्dयांच्यात माझा वास आहे. एकदा ही गोष्ट तुझ्या मनात बिंबली की कोणताही भेदभाव तू करणार नाहीस. त्याचप्रमाणे मनातील भावभावनांपासूनही अलिप्त रहा.
आत्मा ही आपली खरी ओळख असून आत्म्याचा शरीराशी काहीही संबंध नसतो. सर्वांच्या ठिकाणी मी स्थित आहे हे लक्षात घेऊन जो मला त्यांच्यात पाहतो त्याला योगी म्हणतात. असा योग जो साधतो तो योग उत्तम योग म्हणून मला मान्य आहे.
सर्वत्र समबुद्धीने पाहणे म्हणजे ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते निरपेक्षतेने करणे. सर्व विश्व ईश्वरव्याप्त असल्याने समोर दिसणारे जग आभासी आहे हे लक्षात आल्यावर माणसाचे व्यक्ती, वस्तू व परिस्थिती यांच्याकडून अपेक्षा करणे आपोआपच संपुष्टात येते. त्यातून निरपेक्षतेने कर्म करण्याचं कौशल्य साधलं जातं. हे कौशल्य साधलं की, माणसाला जी बुद्धी प्राप्त होते त्याबद्दल सध्या आपण अभ्यासत असलेल्या
आत्मानात्मविवेकेन या बुद्धिर्दैवयोगत: स्वधर्मासक्तचित्तस्य तद्योगो योग उच्यते। ।।48।। ह्या श्लोकात बाप्पा सांगत आहेत.
ते म्हणतात, स्वधर्माचे ठिकाणी चित्त आसक्त असलेल्या मनुष्याला दैवयोगाने व आत्मानात्मविवेकाने होणारी बुद्धि हाच खरं योग होय.
धर्म वेगळा आणि स्वधर्म वेगळा हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. स्वधर्म म्हणजे आपल्याला ईश्वराने नेमून दिलेलं कार्य होय.
जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला ईश्वराने जीवनात काय कार्य करायचं हे ठरवून दिलेलं असतं पण मनुष्य स्वत:च्या बुद्धीने ते सोडून इतर काहीतरी करत बसतो. त्यामुळे त्याच्या आध्यात्मिक प्रगतीत बाधा येते.
स्वत:च्या बुद्धीने वागणाऱ्या मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीकडे ईश्वर दुर्लक्ष करतो. जो स्वधर्म पालन, म्हणजे वाट्याला आलेले काम व्यवस्थित करतो तो ईश्वराचा लाडका होतो. त्याच्यावर देवाची कृपा होऊन त्याला आत्मनात्मविवेक बुद्धी प्राप्त होते.
आत्मनात्मविवेकबुद्धी म्हणजे कोणती गोष्ट आत्म्याशी संबंधित आहे आणि कोणती नाही हे स्पष्ट कळून येणे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाप्रमाणे तो इंद्रियांच्या आहारी जाऊन इंद्रियांनी मोहात पडलेल्या वस्तूंच्या प्राप्तीसाठी धडपडत नाही. त्याला हे कळून चुकलेले असते की, इंद्रियांनी दाखवलेल्या वस्तू ह्या तापुरत्या असून त्यातून मिळणारा आनंदही तेव्हढ्यापुरताच आहे. त्या तात्पुरत्या वस्तू मिळाल्या तरी किंवा न मिळाल्या तरी त्याला होणाऱ्या रागद्वेषादि विकारांमुळे तो आणखीन आणखीन त्यात गुंतून जाणार आहे.
म्हणून तो इंद्रियांच्या आहारी न जाता, त्यांना मुठीत ठेवून त्याला हव्या असतील त्या म्हणजे ज्या गोष्टी त्याच्या आत्म्याचा उद्धार होण्याच्या दृष्टीने उपयोगी असतील त्याच गोष्टी इंद्रियांच्यामार्फत जाणून घेतो. त्यासाठी आवश्यक असलेली आत्मनात्मबुद्धी त्याला निरपेक्षतेने कर्म करत असल्याने प्राप्त झालेली असते. त्यानुसार आत्म्याशी संबंधित असलेल्या गोष्टी तो करत राहतो. त्याने आत्म्याशी संबंधित असलेल्या गोष्टी केल्या की त्याचा आत्मा शरीराच्या कचाट्यातून मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागतो.
जो असे करत नाही तो इंद्रियांच्या आहारी जाऊन त्यांनी दाखवलेल्या प्रलोभनांना बळी पडतो आणि आयुष्य व्यर्थ घालवतो. ह्याउलट जो आत्मनात्मबुद्धी प्राप्त झाल्याने केवळ आत्म्याच्या उद्धाराला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी करत राहतो तो कैवल्यपद प्राप्त करून घेण्याच्या दिशेने पुढे सरकतो.
क्रमश:








