प्रत्येक महिला स्वत:च्या पसंतीचा जोडीदार इच्छिते. अनेक लोक याच्या शोधात पूर्ण आयुष्य घालवत असतात. परंतु ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 42 वर्षीय महिलेने अजब निर्णय घेतला आहे. पसंतीचा जोडीदार न मिळाल्याने तिने स्वत:सोबतच विवाह करण्याचा निर्णय घेतला. या विवाहसोहळ्याकरता तिने लाखो रुपये खर्च केले, या सोहळ्यात मित्र न् परिवाराला आमंत्रित केले.
मी स्वत:साठी मिस्टर परफेक्ट शोधत थकून गेले होते. मनाजोगा जोडीदार शोधण्यात दीर्घ काळ गेला. अशातच आता मनपसंत जोडीदार मिळणार नसल्याचे वाटू लागले. परंतु मी स्वत:वर प्रचंड प्रेम करते, याचमुळे स्वत:सोबतच विवाह करण्याचा निर्णय घेतला. हा क्षण चांगल्याप्रकारे व्यतित करावा असा विचार केला. गरजेच्या प्रसंगी उपयोगी पडतील म्हणून मी काही रक्कम साठवून ठेवली होती. ही पूर्ण रक्कम मी या विवाहसोहळ्याकरता खर्च केली आहे. आता मला कुठल्याही जोडीदाराची गरज नाही. स्वत:सोबतचा हा विवाह सोहळा सल्फोस येथे आयोजित केला असून यात 40 हून अधिक जण सामील झाल्याची माहिती सारा विलकिसन यांनी दिली आहे.
कोरोना काळात लॉकडाउन लागू करण्यात आले होते, तेव्हा मी 40 वर्षांची झाले होते. अशा स्थितीत आता मनपसंत जोडीदार मिळणार नसल्याचा विचार मनात आला. यानंतर स्वत:सोबत विवाह करण्याचे विचार मनात दाटून येऊ लागले आणि तेथेच मिस्टर राइटचा शोध संपुष्टात आला. मनातील विचार मी कुटुंबीयांसमोर व्यक्त केले. कुणालाच माझ्या निर्णयाबद्दल आक्षेप नव्हता, सर्वांनी आनंदच व्यक्त केल्याचे सारा सांगते.
स्वत:सोबत विवाह केल्यावर मला प्रचंड आनंद प्राप्त झाला. मी माझ्या मनासारखे जगत आहे. अनेक वर्षांपर्यंतविवाहासाठी पैसे साठवत होते, अखेरीस ही रक्कम माझ्याकरताच खर्च झाली असल्याचे साराने म्हटले आहे. साराने विवाहसोहळ्यात पारंपरिक पोशाख परिधान केला होता. विवाहसोहळ्याचे एक छायाचित्र व्हायरल झाले असून त्यात ती आईचा हात पकडून विवाहस्थळी प्रवेश करत असल्याचे दिसून येते. सारापूर्वी अनेक महिलांनी स्वत:सोबत विवाह करण्याचे पाऊल उचलले आहे. यात वडोदरा येथील क्षमा बिंदूचाही समावेश आहे. क्षमाने स्वत:सोबत विवाह रचत सर्वांना चकित केले होते.









