हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचाही समावेश
प्रतिनिधी /बेळगाव
विद्यार्थिनींना स्वतःचे रक्षण स्वतःच करता यावे यासाठी ओब्बव्वा योजनेंतर्गत आत्मरक्षणाचे धडे दिले जातात. यापूर्वी केवळ दहावीच्या विद्यार्थिनींना आत्मरक्षणाचे धडे दिले जात होते. यंदा इयत्ता 6 वी पुढील विद्यार्थिनींना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींही धाडसी होणार आहेत.
मुलींवर अन्याय वाढला आहे. स्वसंरक्षण करता यावे या हेतूने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. साधारण अडीच लाखांहून अधिक विद्यार्थिनींना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाने दिली आहे.
समाजकल्याण विभागातर्फे उपक्रम
समाजकल्याण विभागामार्फत हॉस्टेलमधील 24 हजारहून अधिक विद्यार्थिनींना आत्मरक्षणाचे धडे दिले जात आहेत. तर यापुढे आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनींना देखील हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. साधारण 50 हजारांहून अधिक हॉस्टेलमधील विद्यार्थिनींना आत्मरक्षणाचे धडे मिळणार आहेत. याकरिता साधारण 5 कोटी खर्च अपेक्षित आहे.
मुली विद्यार्थी दशेतच होणार निर्भय
समाजात मुली, विद्यार्थी आणि महिलांवर अन्याय, अत्याचार वाढले आहेत. याकरिता विद्यार्थिनींना प्रत्येक संकटाचा सामना करता यावा, निर्भय होऊन समाजात ताठ मानेने जगता यावे, या हेतूने आत्मरक्षणाचे धडे दिले जात आहेत. त्यामुळे मुली विद्यार्थी दशेतच निर्भय होणार आहेत.









