पुणे / प्रतिनिधी :
समग्र शिक्षांतर्गत राज्यातील सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 हजार 259 उच्च प्राथमिक, 1 हजार 279 माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांमधील सहावी ते बारावीच्या मुलींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. मुलींना कराटे, बॉक्सिंग, किक-बॉक्सिंग आदी प्रकार शिकविण्यात येणार असून, 31 मार्चपर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिकांच्या आयुक्तांना या संदर्भातील निर्देश परिपत्रकाद्वारे दिले आहेत. मुलींना मानसिक, बौद्धिक आणि शारीरिकदृष्टय़ा पुरेसे सक्षम करण्यासाठी स्व-संरक्षण प्रशिक्षण आवश्यक आहे. हिंसाचार करणाऱ्यांना संदेश देण्यासाठी, कोणत्याही प्रकारच्या कठीण परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी मुलींना स्वयं कौशल्यात पारंगत करणे, त्यांच्यात आत्मविश्वास आणि जागरूकता विकसित करणे, ही काळाची गरज निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थिनींना गुन्हेगारीविरुद्ध लढण्यासाठी सक्षम करण्यासाठी सहावी ते बारावीच्या मुलींना अनुभवी मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण देण्यासाठी सेवा पुरवठादाराचीही निवड करण्यात आली आहे.
मार्शल आर्टचे प्रशिक्षण 100 तासांचे
मार्शल आर्ट प्रशिक्षण साधारण शंभर तासांचे असेल. हे प्रशिक्षण शाळेतच आणि शाळेच्या वेळेतच होणार आहे. शाळेतील नियमित शिक्षक समन्वयक असतील आणि प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशिक्षणात सहभागी होतील. हे प्रशिक्षण ताणविरहीत वातावरणात घेतले जाईल. शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रशिक्षकांकडून मार्शल आर्टच्या प्रकारांपैकी तायक्वांदो, कराटे, ज्युदो, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग आदी प्रकारांपैकी कोणत्याही प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थिनींना प्रमाणपत्रही दिले जाईल.
अधिक वाचा : प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीवर GPS ची नजर








