जगप्रसिद्ध पॉपस्टारचा नवा माहितीपट
पॉपस्टार सेलेना गोमेझने स्वतःच्या नव्या माहितीपटात मानसिक आरोग्याशी निगडित संघर्षांबद्दल विचार मांडले आहेत. 30 वर्षीय पॉपस्टारने स्वतःचा नवा माहितीपट ‘माय माइंड अँड मी’मध्ये बायपोलर डिसऑर्डरसोबत जगण्याचे स्वतःचे अनुभव मांडले आहेत.
या आजाराला कशाप्रकारे तोंड देणार हे प्रारंभी मलाच माहित नव्हते. या डिसऑर्डरमधून कशाप्रकारे बाहेर पडणार याची कल्पना नव्हती. या आजाराला दैनंदिन जीवनात सामोरे जात नव्या सवयी शिकण्याची गरज होती असे उद्गार सेलेनाने काढले आहेत.
बायपोलर डिसऑर्डरनंतरही मी चांगल्या मानसिक स्थितीत आहे. मी आता अत्यंत आनंदी असून स्वतःच्या भावना आणि विचारांवर पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात नियंत्रण ठेवू शकत आहे. नव्या माहितीपटात स्वतःच्या समस्यांबद्दल सांगताना संकोच वाटत होता. वैयक्तिक बाब जाहीर करताना भीती वाटत होती. परंतु माझे अनुभव आणि समस्या मांडल्यास लोकांना स्वतःची कहाणी शेअर करण्यास प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा असल्याचे सेलेनाने म्हटले आहे.









