पुणे / प्रतिनिधी :
अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले, अल्बामा येथे उभारलेल्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरमधील ‘नासा’च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा 20 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येत आहे. इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलांना ही परीक्षा देता येणार असून, या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 20 जुलै 2023 ते 15 ऑगस्ट 2023 अशी असल्याची माहिती यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरच्या अँबेसेडर व स्वान फाउंडेशनच्या संचालक सुदेष्णा परमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी स्वान फाउंडेशनचे संचालक एम. तिरुमल, आयेशा सय्यद, शशिकांत कांबळे, संचालक अश्विनी सांळुके आदी उपस्थित होते.
आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा
सुदेष्णा परमार म्हणाल्या, स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने भारतामध्ये पहिल्यांदाच टेनिंग प्रोग्रामच्या निवडीसाठी महाराष्ट्रामध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल. प्रामुख्याने गणित, विज्ञान, भूगोल, बुद्धिमापन यावर आधारित प्रश्नपत्रिका असेल. यामुळे विद्यार्थी चाकोरीबाहेर जाऊन विषयांचा अभ्यास करणार आहेत. शिवाय अंतराळविषयक संशोधन, प्रात्यक्षिके यांचा अभ्यास त्यांना विद्यार्थीदशेत करायला मिळणार असून, येणाऱया पिढीसाठी हे महत्त्वाचे आहे.
असे असेल परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक
ही परीक्षा महाराष्ट्रातील इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमातील शाळांसह जिल्हा परिषद, महानगपालिका, नगरपालिका शाळांचाही समावेश आहे. या परीक्षेसाठी 20 जुलैपासून नावनोंदणी करता येणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत नावनोंदणी सुरू राहील. 20 ऑगस्ट रोजी नावनोंदणी झालेल्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये ही परीक्षा होईल. परीक्षेचा निकाल 28 ऑगस्ट 2023 रोजी घोषित होईल. या परीक्षेतून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबरमध्ये युएस स्पेस अँड रॉकेट सेंटर, हन्टस्वीले, अल्बामा येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी नेण्यात येईल. अमेरिकेतील स्पेस कॅम्प, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, ऑरलॅन्डो या ठिकाणीही विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यात येणार आहे. अमेरिकेला 35 व सिंगापूर येथील सायन्स सेंटरला 35 अशा 70 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून, त्यांचा सर्व खर्च संस्थेमार्फत केला जाणार आहे.








