वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ‘सपोर्ट स्टाफ’ला यापुढे दीर्घकालीन करारावर नियुक्त केले जाईल, कारण ‘बीसीसीआय’ने हंगामी तत्त्वावर त्यांची नियुक्ती करण्याची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बीसीसीआय’च्या घटनेनुसार, मुख्य प्रशिक्षकाची निवड ही क्रिकेट सल्लागार समितीने करायची असते, तर इतर प्रशिक्षकांची निवड ही निवड समितीकडून केली जाते.
तथापि, महिला संघाचा सपोर्ट स्टाफ म्हणजे फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीतील प्रशिक्षकांची निवड करताना या नियमाचे भूतकाळात काटेकोरपणे पालन केले गेलेले नसून ‘बीसीसीआय’ने हंगामी तत्त्वावर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रशिक्षकांची नियुक्ती करणे पसंत केलेले आहे. पण आता सर्व प्रशिक्षकांना दीर्घकालीन करार दिले जातील आणि यापूर्वी आपण जसे पाहिले आहे तशी ही तात्पुरती व्यवस्था राहणार नाही. यामुळे संघाला आवश्यक स्थिरता मिळेल, असे बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले.
रविवारी ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या डिसेंबरमध्ये रमेश पोवारला हटविल्यापासून महिला क्रिकेट संघ मुख्य प्रशिक्षकाशिवाय खेळत आला आहे. फेब्रुवारीमध्ये हा संघ मुख्य प्रशिक्षकाविना ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेतही खेळला. वरिष्ठ महिला संघाला अद्याप जागतिक किताब जिंकता आलेला नाही आणि प्रशिक्षकांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करणे ही आयसीसीच्या पुढील स्पर्धेसाठीच्या तयारीची पहिली पायरी असेल. याशिवाय 2023 ते 2027 या कालावधीतील देशांतर्गत सामन्यांचे प्रसारण हक्क प्रदान करण्याचा विषय देखील बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवर होता. परंतु या विषयावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.









