ओटवणे प्रतिनिधी
राज्य शालेय शिक्षण विभागाच्या कोकण विभागीय शिक्षण मंडळाच्या सदस्यपदी सांगेली माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र घावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभागीय मंडळात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.प्राचार्य रामचंद्र घावरे यांनी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे कोषाध्यक्ष पद भूषविले असून सध्या ते या महामंडळाचे सदस्य आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे ते उपाध्यक्ष असून गेली २४ वर्षे ते ग्रामीण भागात माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सोयीसाठी योगदान देत आहेत. प्राचार्य रामचंद्र घावरे यांच्या शिक्षण क्षेत्रातील अनुभव व योगदानाची दखल घेऊन त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.









