माडखोल -धवडकी शाळेचा विद्यार्थी
ओटवणे प्रतिनिधी
मुंबई येथील प्रथम एज्युकेशन मुंबई मार्फत सुरु असलेल्या शाळेबाहेरची शाळा या उपक्रमाअंतर्गत नागपूर आकाशवाणीवरील ”फोन इन” या कार्यक्रमासाठी माडखोल धवडकी शाळा नं. २ मधील इयत्ता ६ वीतील विद्यार्थी कु. जयजनार्दन कोंडू बरागडे याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झाली आहे. या कार्यक्रमाचे प्रसारण गुरूवारी ७ सप्टेंबर रोजी नागपूर आकाशवाणी वरून सकाळी १०:३० वा करण्यात येणार आहे.
आकाशवाणीवर निवड होणारा जयजनार्दन बरागडे हा या शाळेचा सहावा विद्यार्थी आहे. यापूर्वी या शाळेतील कु उत्कर्षा राऊत व कु सुमेग राऊळ, कु. अनुष्का हावळ, मेघना सावंत, कार्तिकी वर्दम यांची निवड या कार्यक्रमासाठी झाली होती. यासाठी प्रथम एज्युकेशनच्या कोकण समन्वयक ऋतुजा पाटील यांचे शाळेला सहकार्य लाभले.
कु जयजनार्दन बरागडे याच्या निवडीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय राऊत, शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे, माता पालक संघ, पालक शिक्षक संघ, सर्व शिक्षक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.









