केएससीए आयोजित क्रिकेट स्पर्धा : दीपक चौगुलेची प्रशिक्षकपदी निवड
प्रतिनिधी /बेळगाव
बीसीसीआयच्या मान्यतेनुसार कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आयोजित महाराजा चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी बेळगावच्या चार खेळाडूंची व एकाची प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.
गेल्या चार वर्षापासून कर्नाटकात टी-20 क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे कर्नाटक राज्यातील अनेक होतकरू क्रिकेटपटु या स्पर्धेपासून वंचित राहिले. अनेक खेळाडुंना संधी व फॉम असूनसुद्धा स्पर्धा न भरविल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टींची दखल घेऊन यावषीपासून कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने महाराजा चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरविले. ही स्पर्धा 6 संघांमधून साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. मंगळूर युनायटेड, शिवमोगा स्ट्रायकर्स, बेंगळूर ब्लास्टर, गुलबर्गा मायस्टीक्स, हुबळी टायगर्स व म्हैसूर वॉरियर्स या संघा दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. बेळगावचा आघाडीचा मध्यमगती गोलंदाज रोनित मोरे याची बेंगळूर ब्लास्टर संघामध्ये निवड झाली आहे. बेळगावचा डावखुरा फलंदाज व टी-20 क्रिकेट स्पर्धेत कर्नाटक संघाला अंतिम फेरीत पोहोचविणारा रोहन कदम याची शिवमोगा स्ट्रायकर्स या संघात निवड झाली आहे.
बेळगावचा होतकरू यष्टीरक्षक सुजय सातेरी याची निवड मंगळूर युनायटेड संघात निवड झाली आहे. बेळगावचा होतकरू अष्टपैलू खेळाडु स्वप्निल एळवे याची हुबळी टायगर्स संघात स्थान मिळाले आहे. तर बेळगावचा अष्टपैलू खेळाडू व कर्नाटक संघाचा ज्येष्ठ खेळाडू दीपक चौगुले याची हुबळी टायगर्स संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. निवड झालेले चार खेळाडू बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे असून त्यांना अविनाश पोतदार, दीपक पवार, ज्ये÷ प्रशिक्षक संगम पाटील व विवेक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.









