क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
गोवा येथे होणऱ्या युवा इंडियन लीग (युथ आय लीग) राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगावमधील मानस स्पोर्ट्स फुटबॉल फौंडेशनच्या आयान किल्लेदार, रेहान किल्लेदार, स्पर्श देसाई, कृष्णा मुचंडी यांची निवड झाली आहे.
गोवा येथे होणाऱ्या या स्पर्धेत देशातील 29 राज्यातील 50 फुटबॉल संघ सहभागी झाले आहेत. एकूण देशभरातील 10 शहरांमध्ये ही स्पर्धा चालू आहे. आयान किल्लेदार, रेहान किल्लेदार, स्पर्श देसाई, कृष्णा मुचंडी हे गुजरात येथील एआरएएफसी संघातून खेळणार आहेत. एआरएएफसी फुटबॉल संघाचा या स्पर्धेत ‘जे’ गटात समावेश करण्यात आला आहे. जे गटात देशातील नामवंत एफसी गोवा, बेंगलोर एफसी, चर्चिल ब्रदर्स गोवा, झिंक फुटबॉल एफसी, राजस्थान या संघांचा समावेश आहे. आयान किल्लेदार, रेहान किल्लेदार, स्पर्श देसाई, कृष्णा मुचंडी यांना फुटबॉल प्रशिक्षक मानस नायक, विवेक नागुल व सलीम पठाण यांचे मार्गदर्शन लाभत आहे. बेळगाव शहरातून प्रथमच या युवा फुटबॉलपटूंची निवड झाली आहे.









