बेळगाव : हल्याळ येथे घेण्यात आलेल्या पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या डीवायईएस स्पोर्टस हॉस्टेलच्या कुस्तीपटूंनी तीन सुवर्ण, एक रौप्य, एक कास्य पदकासह घवघवीत यश संपादन केले आहे. हल्याळ येथे घेण्यात आलेल्या पदवीपूर्व शिक्षण खाते हल्याळ आयोजित राज्यस्तरीय पीयूसी कुस्ती स्पर्धेत बेळगाव डीवाईएस स्पोर्टस हॉस्टेलच्या कुस्तीपटू स्वाती पाटील हीने 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकाविले, प्रज्ञा पाटील हिने 68 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. प्रांजळ तुळजाई हिने 72 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकाविले. अनुष्का जनगौडा हेने 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम फेरीत तिला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
भाग्यश्री हिने 53 किलो वजनी गटात कास्यपदक मिळविले. वरील सर्व कुस्तीपटूंना एकलव्य पुरस्कार विजेती एनआयएस कुस्ती प्रशिक्षक स्मिता पाटील व कुस्ती प्रशिक्षक नागराज एन., हनमंत पाटील यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे. तर युवजन क्रीडा अधिकारी बी. श्रीनिवास यांचे प्रोत्साहन मिळत आहे. वरील सुवर्णपदक विजेत्या तिन्ही खेळाडूंची दिल्ली येथे होणाऱ्या एसजीएफआय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी कर्नाटक पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या राज्यस्तरीय संघात निवड झाली आहे.









