वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय संघाच्या गळ्यातील ताईत म्हणता येणारा सुनील छेत्री, बचावपटू संदेश झिंगन आणि प्रथम पसंतीचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू यांची आगामी आशियाई खेळांसाठीच्या 22 सदस्यीय भारतीय पुऊष फुटबॉल संघात निवड करण्यात आली आहे. चीनच्या हांगझाऊ येथे आशियाई खेळ होणार असून तेथे भारतीय संघ राष्ट्रीय वरिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांच्या देखरेखीखाली असेल.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघ छेत्रीच्या नेतृत्वाखालील आणि 1998 च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत क्रोएशियातर्फे खेळलेले स्टिमॅच यांच्या प्रशिक्षणाखालील आपला पहिल्या स्तराचा संघ आशियाई खेळांसाठी पाठवण्यास उत्सुक असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर ही घडामोड घडली आहे. या भारतीय संघाला आशियाई खेळांचे आयोजक आणि ‘ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशिया’ची मान्यता मिळाल्याची माहिती मिळाली आहे.
खंडातील आघाडीच्या आठ संघांमध्ये समाविष्ट होणाऱ्या संघांना पाठविण्याबाबतच्या क्रीडा मंत्रालयाच्या निकषांमुळे आशियाई खेळांमध्ये भारतीय पुऊष आणि महिला फुटबॉल संघांच्या सहभागाबाबत यापूर्वी संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. मंत्रालयाने ‘एआयएफएफ’च्या आवाहनानंतर निकष शिथील करून दोन्ही संघांना मंजुरी दिली. मुख्य प्रशिक्षक स्टीमॅच यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती.
आशियाई खेळांतील फुटबॉल स्पर्धा ही 23 वर्षांखालील खेळाडूंची स्पर्धा असते. परंतु या स्पर्धेचे आयोजन करण्यास एका वर्षाचा विलंब झाल्यामुळे आयोजकांनी 24 वर्षे वयाच्या खेळाडूंना भाग घेण्यास परवानगी दिली आहे. जकार्ता येथे 2018 साली झालेल्या आशियाई खेळांना मुकल्यानंतर भारतीय वरिष्ठ फुटबॉल संघ आता आशियाई खेळांत पुनगरागमन करणार आहे.
संघ-गोलरक्षक : गुरप्रीत सिंग संधू, गुरमीत सिंग, धीरज सिंग मोइरांगथेम, बचावपटू : संदेश झिंगन, अन्वर अली, नरेंद्र गहलोत, लालचुंगनुंगा, आकाश मिश्रा, रोशन सिंग, आशिष राय, मिडफिल्डर : जॅक्सन सिंग थौनाओजम, सुरेश सिंग वांगजाम, अपुया राल्टे, अमरजित सिंग कियाम, राहुल केपी, नौरेम महेश सिंग., आघाडीपटू : शिवशक्ती नारायणन, रहीम अली, सुनील छेत्री, अनिकेत जाधव, विक्रम प्रताप सिंग, रोहित दानू.









