25 लाभार्थ्यांची नावे वगळल्याचा आरोप; अखेर ठरावाला मंजुरी
बेळगाव : महापालिकेच्या आरोग्य आणि स्थायी समितीच्यावतीने मागासवर्गीय निधीसाठी लाभार्थ्यांची नावे निश्चित करण्यात आली होती. त्याला तत्कालिन अध्यक्षांनीही मंजुरी दिली होती. मात्र नूतन अध्यक्षांनी जुन्या 25 लाभार्थ्यांची नावे वगळली असल्याने याबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी विरोधी गटनेते मुज्जमिल डोणी यांनी लावून धरली. त्यामुळे मागच्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यावरून गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला.
मागासवर्गीयांसाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या योजनांसाठी लाभार्थ्यांची आरोग्य स्थायी समितीकडून निवड करण्यात आली होती. मात्र याला सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळणे जरुरीचे असल्याने बैठकीत मागच्या इतिवृत्ताला अनुमोदन देण्यात यावे, अशी मागणी आरोग्य व स्थायी समिती अध्यक्षांनी केली. मात्र याबाबतची संपूर्ण माहिती सभागृहाला दिल्यानंतर इतिवृत्ताला मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी विरोधी गटनेते मुज्जमिल डोणी यांनी महापौरांकडे केली. तसेच जुन्या काही लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
परिणामी या विषयावरून बराच उशीर सभागृहात चर्चा रंगली. जुन्या लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आलेली नसून त्यामध्ये आणखी काही जणांची नावे वाढविण्यात आली असल्याची माहिती कौन्सिल सेक्रेटरी उदयकुमार तळवार यांनी दिली. मात्र यावर समाधान न मानता विरोधी गटाने लाभार्थ्यांच्या नावाची यादी देण्याची मागणी केली. यादी देण्यात येत नाही तोपर्यंत ठराव मंजूर करण्यात येऊ नये, अशी भूमिका विरोधी गटाने घेतली. पण यावर बराच उशीर चर्चा झाल्यानंतर अखेर ठरावाला मंजुरी देण्यात आली.









