4 डिसेंबरपर्यंत यादीबाबत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन
बेळगाव : महानगरपालिकेत अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीचा मार्ग मोकळा झाला असून 155 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सदर यादी जाहीर केली आहे. मनपामध्ये कंत्राटी व इतर कराराच्या आधारावर सेवा बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची कर्नाटक मुन्सिपल कॉर्पोरेशन कायद्यांतर्गत नेमणूक करण्यात आली आहे. बेळगाव महानगरपालिकेमध्ये थेट नेमणुकीअंतर्गत रिक्त असणाऱ्या 155 सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पात्रताधारक सफाई कर्मचाऱ्यांकडून दाखल करण्यात आलेल्या अर्जानुसार ही नेमणूक केली आहे. दाखल करण्यात आलेले अर्ज संबंधित समितीकडून छाननी करून पात्रताधारकांची नेमणूक केली आहे. महानगरपालिकेच्या रोस्टर नियमानुसार पात्रधारक कर्मचाऱ्यांची तात्कालिक यादी जाहीर करण्यात आली आहे. सदर यादी जाहीर झाल्यानंतर दि. 4 डिसेंबरपर्यंत सायंकाळी 4 वाजेपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आक्षेप नोंदविणाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह मनपा आयुक्तांकडे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले आहे. तसेच जाहीर केलेल्या तात्कालिक निवड यादीवर मनपा आयुक्तांकडे आक्षेप नोंदविल्यास मनपा आयुक्तांनी आवश्यक कागदपत्रांची छाननी करून स्पष्ट शेरा निश्चित केलेल्या नमुन्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे दि. 5 डिसेंबरपर्यंत सायंकाळी 4 वाजेपर्यंत अहवाल सादर करावा. यानंतर येणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसीद्वारे कळविले आहे.









