103 किलो गांजाचा समावेश : 36 लाखांहून अधिक किंमत
बेळगाव : बेळगाव शहर परिसरात जप्त करण्यात आलेले 103 किलोहून अधिक अमलीपदार्थ बुधवारी नष्ट करण्यात आले. त्याची किंमत 36 लाख 48 हजार 990 रुपये इतकी होते. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेल्या गांजा, चरस व मेथापेंटामाईन आदी 36 गुन्हेगारी प्रकरणांतील 103 किलो 809 ग्रॅम 18 मिली इतके अमलीपदार्थ नष्ट करण्यात आले. ड्रग्ज डिस्पोजल कमिटीचे चेअरमन व पोलीस उपायुक्त निरंजनराजे अरस, गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळ, औषध नियंत्रण मंडळ व कारखाना विभागाच्या उपसंचालकांच्या उपस्थितीत सौंदत्ती तालुक्यातील हारुगोप्प येथील दि बेळगाव ग्रीन एन्व्हायरन्मेंट प्रा. लि. या कारखान्यात नियमानुसार वैज्ञानिकपणे अमलीपदार्थ नष्ट करण्यात आले.









