आटपाडी :
आटपाडी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेली चारचाकी गाडीला शनिवारी सकाळी आग लागली. पोलीस अधिकारी, कर्मचारी व काही राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत आग आटोक्यात आणण्यासाठी कष्ट घेतले.
आटपाडी पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशस्त इमारतीसमोर आणि जुन्या इमारतीच्या पाठीमागील बाजुस विविध गुन्हे, अपघातातील वाहने उभी करण्यात आली आहेत. त्यातीलच एका चारचाकी वाहनाला अचानक आग लागली.
प्रारंभी कोणीतरी कचरा जाळल्याचा अंदाज असल्याने त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. परंतु युवा सेना तालुकाप्रमुख मनोज नांगरे यांना कचरा नसून कारने पेट घेतल्याचे लक्षात आले.
मनोज नांगरे यांनी पोलीस प्रमोद रोडे यांना फोनवरून कारने पेट घेतल्याची कल्पना दिली. त्यानंतर सपोनि विशेंद्रसिंग बायस यांच्यासह ठाण्यातील पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासह ज्येष्ठ नेते शहाजीबापू जाधव, मनोज नांगरे, संतोष पाटील, विजय देवकर आदिंनी दत्ता वस्ताद देशमुख यांच्या हॉटेलमधून पाणी उपलब्ध करून पेटलेल्या कारची आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तसेच पुर्वीच्या पोलीस ठाण्याच्या एका इमारतीतील नळ जोडून त्याव्दारेही आग विझविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांना आग विझविण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करण्याचे आवाहन केले. बऱ्याच प्रयत्नानंतर गुन्ह्यातील जप्त पेटलेली आय-२० कारची आग आटेक्यात आली. आग लागलेल्या ठिकाणी अज्ञाताने कचरा पेटविल्याचा किंवा सिगरेट, बिडेचे जळते थोटके फेकल्याने हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
वेळेत आगीची घटना निदर्शनास आल्याने परिसरातील अन्य जप्त वाहनांना त्याची झळ बसली नाही, अन्यथा अन्य वाहनेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती.








