दसऱ्याच्यानिमित्ताने राज्यात उत्साहाचे वातावरण असले तरी दुसरीकडे राजकीय घडामोडींनी मात्र वेग घेतला असल्याचे पाहायला मिळते आहे. मुडामधील भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पायउतार व्हावे लागणार का हे लवकरच कळणार आहे. ते पायउतार झाले तर त्यांच्या जागी दुसरे कोण या प्रश्नाचाही शोध घेतला जात आहे. विरोधी गटातील नेत्यांना अडकवण्याचे बेत आखले जात आहेत. सीमोल्लंघनाच्या तयारीतच राजकीय रणांगणही तापू लागलंय, हेच खरं.
विजयादशमीला होणाऱ्या जम्बो सवारीसाठी म्हैसूरमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. राज्यात दसरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चैतन्यदायी वातावरण असतानाच राजकीय पक्ष व नेत्यांमधील संघर्ष सुरूच आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मुडामधील भूखंड घोटाळ्यात अडकवण्यात आल्यानंतर अशाच घोटाळ्यात भाजप नेत्यांना अडकवण्यासाठी काँग्रेसने तयारी पूर्ण केली आहे. भूखंड घोटाळ्याच्या चौकशीत ईडीची एंट्री झाल्यानंतर काँग्रेस नेते सतर्क झाले आहेत. जर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना अटक झालीच तर तशाच पद्धतीच्या कारवाईने भाजपला धक्का देण्याचे काँग्रेसने ठरविले आहे. त्यामुळे भाजपच्या राजवटीतील घोटाळ्यांची यादीच तयार करण्यात आली असून केंद्रीय यंत्रणांनी मुख्यमंत्र्यांना अटक केली तर कर्नाटकातील भाजपच्या किमान चार ते पाच नेत्यांना गजाआड करण्याची तयारी सरकारने ठेवली आहे. दसऱ्यानंतर हा संघर्ष आणखी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.
बहुचर्चित बिटकॉईन प्रकरण, साहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीतील घोटाळा, राज्यातील वेगवेगळ्या विद्यापीठातील घोटाळे, बागायत व कृषी खात्यामध्ये सबसिडीच्या नावे झालेले घोटाळे, गंगाकल्याण योजनेच्या अंमलबजावणीत झालेला गैरव्यवहार, पाटबंधारे योजनांचे कंत्राट देण्यात झालेली कमिशनबाजी, कोरोनाच्या काळात चामराजनगर जिल्हा इस्पितळात वेळेत ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांचे मृत्यू झाले. ही प्रकरणे पुन्हा उकरून काढून भाजप नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसने व्यूहरचना केली आहे. भोवी विकास निगममधील गैरव्यवहार व भाजपच्या राजवटीत झालेल्या घोटाळ्यांची यादीच तयार करण्यात आली आहे. खासकरून भाजप सत्तेवर असताना कर्नाटकातील कंत्राटदारांनी मंत्री-आमदारांवर 40 टक्के कमिशनचा आरोप केला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीतही हा आरोप निवडणूक प्रचाराचा मुद्दा ठरला. आता या आरोपाची चौकशी करण्याचे काँग्रेसने ठरविले आहे. कोरोनाच्या काळात औषधे व इतर वैद्यकीय साहित्य खरेदी करताना झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यांचाही अहवाल सरकारकडे तयार आहे.
भाजपच्या काळातील घोटाळ्यांची कसून चौकशी सुरू झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा मुख्यमंत्र्यांवरील आरोपांची चौकशी करताना कोणती भूमिका घेतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस नेत्यांची धडपड सुरू झाली आहे. ज्या ज्या राज्यात विरोधी पक्षांचे सरकार आहे, त्या सरकारला अडचणीत आणण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर कसा केला जातो? याविषयी उघडपणे माहिती देत केंद्र सरकारवरच हल्लाबोल करण्याचेही काँग्रेसने ठरवले आहे. भाजपच्या राजवटीतील एकूण 26 घोटाळ्यांची यादी तयार करण्यात आली असून हा संघर्ष वाढलाच तर वेगवेगळ्या घोटाळ्यात भाजप नेत्यांचीही धरपकड होणार, हे स्पष्ट आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांचा बचाव करतानाच दुसरीकडे भाजप-निजद युतीचा तितक्याच आक्रमकपणे सामना करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. यासाठी सिद्धरामय्या समर्थक मंत्री, आमदार कामाला लागले आहेत.
गेल्या पंधरवड्यापासून सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी ठळक चर्चेत आले आहेत. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर व मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा यांची भेट घेऊन सतीश जारकीहोळी यांनी केलेल्या राजकीय चर्चेनंतर कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाची वेळ जवळ आली आहे का? असा संशय बळावला आहे. या दोन्ही नेत्यांशी चर्चा करण्याआधी सतीश जारकीहोळी यांनी नवी दिल्ली येथे एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे. या नेत्यांची भेट घेण्यात काही नवे नाही. आपल्याच पक्षाचे नेते आहेत, भेटले तर गैर काय आहे? असे सांगत या भेटीत काही राजकीय कारणे नाहीत, असे सतीश जारकीहोळी सांगत असले तरी राजकीय कारणामुळेच या नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत, हे लपून राहिले नाही. जर सिद्धरामय्या यांना पायउतार व्हावे लागलेच तर दलितांना मुख्यमंत्रिपद द्यावे, या मागणीसाठी काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना राज्य राजकारणात आणले तरच पक्षातील गटबाजीवर तूर्त नियंत्रण मिळवता येणार आहे, असा यामागचा तर्क आहे. जर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर दलित नेत्यांनी कोणती भूमिका घ्यायची? यासंबंधीची खलबते सुरू झाली आहेत. डी. के. शिवकुमार मात्र संयमाने या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनीही सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली आहे. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश व सतीश जारकीहोळी यांच्यात चर्चा झाली आहे. या घडामोडी लक्षात घेता सिद्धरामय्या यांना पायउतार व्हावे लागले तर काय करावे, याची तालीम काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे, हे लक्षात येते.
सध्या सतीश जारकीहोळी हे राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहेत. बी. वाय. विजयेंद्र यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. डी. के. शिवकुमार व त्यांचे बंधू डी. के. सुरेश यांच्याशी ते नेहमी अंतर ठेवून आहेत. आता या नेत्यांची झालेली भेट ठळक चर्चेत आली आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी भेट झाली आहे, असे हे सारे नेते सांगत असले तरी वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच या गाठीभेटी सुरू आहेत, हे दिसून येते. पक्षासाठी रोज 12 तास आपण निष्ठेने काम करतो. डॉ. जी. परमेश्वर व डॉ. एच. सी. महादेवप्पा यांच्याशी झालेली चर्चाही पक्षहितासाठीच झाली आहे, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले आहे. काँग्रेसमध्ये कोणीही किंगमेकर होणार नाहीत. विमानतळाबाहेर केवळ बॅनर लावून लक्ष वेधणारे नेते कोण? पडद्याआड राहून पक्षाची कामे करणारे नेते कोण? याची माहिती हायकमांडला आहे, असे सांगत पक्षातील सध्याच्या घडामोडींवर त्यांनी बोलके भाष्य केले आहे. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकातील घडामोडी हायकमांड पाहते आहे, असे सांगत सातत्याने बैठका घेणाऱ्या नेत्यांना एकप्रकारचा इशाराच देण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही कोणालाही घाबरत नाही, असे सांगणारे सतीश जारकीहोळी सध्या कर्नाटकातील राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू ठरले आहेत.








