मराठी विद्यानिकेतन येथे हजारो भाविकांची उपस्थिती : खेळणी-खाद्यपदार्थांचे स्टॉल
बेळगाव : बेळगावमध्ये मंगळवारी पारंपरिकरीत्या मराठी विद्यानिकेतनच्या पटांगणावर सीमोल्लंघन सोहळा पार पडला. मानाच्या पालख्या व सासनकाठ्या सीमोल्लंघन मैदानावर एकत्रित आल्यानंतर सीमोल्लंघन पार पडले. हा सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. चव्हाट गल्ली येथील देवदादा सासनकाठी मंदिरापासून कटल्याची मिरवणूक सुरू झाली. मारुती गल्ली येथील मारुती मंदिरापासून मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीमध्ये कपिलेश्वर, मातंगी, समादेवी यासह मारुती मंदिराचे वाहन, कसाई गल्ली, बसवाण गल्ली येथील देवीचे वाहन सहभागी झाले होते. या सर्व पालख्या कॉलेज रोडमार्गे मराठी विद्यानिकेतन शाळेच्या पटांगणात दाखल झाल्या.
वतनदार रणजित चव्हाण-पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्याचसोबत बळवंत चव्हाण-पाटील, अभिजीत चव्हाण-पाटील, नंदकिशोर चव्हाण-पाटील, राजेंद्र चव्हाण-पाटील, अभिषेक चव्हाण-पाटील, तुषार चव्हाण-पाटील, अभिनव चव्हाण-पाटील यांच्या उपस्थितीत शस्त्रपूजन करण्यात आले. चव्हाण-पाटील घराण्याने पूजन केल्यानंतर सोने लुटण्यासाठी मैदान परिसरात तुफान गर्दी झाली होती. गर्दी टाळण्यासाठी शंभू जत्ती महादेव मंदिरासमोर पार्किंगची व्यवस्था केली होती. सोने लुटण्याच्या कार्यक्रमानंतर पालख्या माघारी परतल्या. वाजतगाजत, पारंपरिक पालखी सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मैदान परिसरात खेळणी व खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडले होते. यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील, माजी आमदार अनिल बेनके, एसीपी एस. आर. कट्टीमनी, माजी महापौर मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडुस्कर, गणेश द•ाrकर यासह बेळगावचे मानकरी उपस्थित होते.
कॅम्प येथे देवींचा रथोत्सव थाटात
दसऱ्याच्या मुहूर्तावर कॅम्प येथे पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. कॅम्प परिसरातील पाच जागृत देवींची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यामुळे मंगळवारी रात्री कॅम्पमधील रस्ते गर्दीने फुलले होते. राक्षसांचे मुखवटे धारण केलेल्या युवकांचे नृत्य या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. कॅम्प परिसरातील फिश मार्केट येथील महामाता कुंतीदेवी, बी मद्रास स्ट्रीट येथील दुर्गा मुत्तूमरिअम्मा देवी, खानापूर रोड येथील मरिअम्मा देवी, आर. ए. लाईन येथील कुलकतम्मा, तेलगू कॉलनी येथील मरिमाता-दुर्गामाता या देवींची नवरात्रीमध्ये विशेष पूजा केली जाते. विजयादशमी दिवशी या देवींची सजविलेल्या रथांमधून भव्य मिरवणूक निघते. ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. फिश मार्केट, हायस्ट्रीट, पोलीस क्वॉर्टर्स, धर्मवीर संभाजी चौक, वनिता विद्यालय, सेंट झेवियर्स, कॅटल रोडमार्गे कॅम्प येथे मिरवणुकीची सांगता झाली. एलईडी लाईट्सच्या प्रकाशामध्ये ढोल-ताशांच्या गजरात तरुणाईने फेर धरला. मिरवणुकीचे आकर्षण ठरले ते मुखवटाधारी राक्षस. राक्षसांच्या वेशभूषा धारण केलेले तरुण तालात नृत्य करत होते. हे दृश्य मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत कॅम्प परिसरात मिरवणूक पार पडली.









