कोल्हापूर : प्रतिनिधी
ऐतिहासिक दसरा चौक येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करून सीमोल्लंघन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, पद्मश्री डी. वाय. पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यंदा पहिल्यांदाच या महोत्सवामध्ये शासनाचा सहभाग असल्याने शाही लवाजम्यासह हा शाही दसरा पार पडला.
कोल्हापुरातल्या भवानी मंडपातून या पालखीला सुरुवात झाली. या पालखीत हत्ती, घोडे आणि शाही लवाजवण्यासह पालखीला सुरुवात झाली. यंदा कोल्हापुरातील शाही दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला. या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात हा शाही दसरा संपन्न होत झाला.
दसऱ्याला राजा आणि प्रजा यांच्यातील अंतर दूर होऊन भावबंध जुळतात. विजयादशमीच्या दिवशी भवानी मंडपातून शाही मिरवणुकीला सुरुवात झाली. तुळजा भवानीची पालखी, श्री. गुरुमहाराज यांची पालखी आणि अंबाबाईची पालखी अशा तीन पालख्या कोल्हापूर शहरातील दसरा चौकात एकत्रित आल्या. निमंत्रितांसह मानकरी आणि नागरिकांना बसण्यासाठी आलिशान शामियाना उभारन्यात आला होता.
याचवेळी मेबॅक या विदेशी बनावटीच्या मोटारीतून न्यू पॅलेसवरून शाही घराण्यातील श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे, शहाजीराजे आणि यशराजे शाही लवाजम्यासह दसरा चौकात आगमन झाले.त्यांचे बॅण्ड पथकाने स्वागत करण्यात आले. त्यांच्या हस्ते चौकातील शमीच्या पानांचे पूजन केल्यानंतर सोने लुटण्याचा थरार दसरा चौकात पाहायला मिळाला. आनंद, उत्साह आणि परंपरेचा बाज जपत दसऱ्याचा सोहळा पार पडला. दसरा चौकात झालेल्या या सोहळ्यास करवीरवासीयांनी उपस्थिती लावून या परंपरेशी आपला पिढ्यान्पिढ्याचा असलेला संबंध अधिक दृढ केला. या वेळी चैतन्यदायी गर्दीने दसरा चौकाचा परिसर फुलून गेला. हा सोहळा पाहण्यासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच लोकांनी गर्दी केली होती. मावळत्या सूर्याच्या साक्षीने करवीरनगरीचा पारंपरिक शाही दसरा सोहळा मोठ्या उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला.









