बेळगाव : अनगोळ येथे पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन सोहळ्यासोबत दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले. ग्रामदैवत कलमेश्वर मंदिर येथे दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दररोज पहाटे तसेच रात्री देवीचे पूजन करण्यात येत होते. दशमीला मंदिरात शस्त्रपूजन करून पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. मारुती गल्ली, लोहार गल्ली, नाथ पै नगर, बाबले गल्ली, शिवशक्तीनगर, विद्यानगर मार्गे घुमटमाळ येथे पालखी आली. पालखीसोबत हक्कदार, शस्त्रधारी उपस्थित होते. अनगोळ ते हिंदवाडीपर्यंत धावत ही पालखी आणण्यात आली. घुमटमाळ येथे मंदिर प्रदक्षिणा घालून आपट्याचे झाड जमिनीत रोवले जाते व पुजाऱ्यांच्यावतीने पालखीचे पूजन व गाऱ्हाणे घालण्यात आले. हक्कदारांच्यावतीने शमीच्या झाडाचे तलवारीने पान कापून सीमोल्लंघन करण्यात आले. त्यानंतर शमीच्या झाडाचे सोने लुटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
दुर्गादेवी मूर्ती विसर्जन उत्साहात
अनगोळ येथे अनेक मंडळांनी दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. भंडाऱ्याची उधळण करत गुरुवारी देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. बाबले गल्ली, आंबेडकर गल्ली, गणपत गल्ली, रघुनाथ पेठ, साई सोशल वेल्फेअर फाऊंडेशन तसेच कोनवाळ भागातील मूर्तींची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. भक्त पुंडलिक विसर्जन तलाव येथे मोठ्या प्रमाणात विसर्जनासाठीची गर्दी पाहायला मिळाली. टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक परशराम पुजेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.









