प्रतिनिधी,कोल्हापूर
Seema Deo Kolhapur Old Memories : सीमा देव यांनी जवळपास 80 मराठी, हिंदी चित्रपटात काम केले आहे. एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रेमळ, सुशिल, आनंदमुर्ती असलेल्या सीमा देव यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव मुंबईच्या असल्या तरी कोल्हापुरच्या स्नुषा होत्या. त्यामुळे त्यांच्या जाण्याने कोल्हापुरकरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
दत्ता धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेला आलीया भोगाशी या चित्रपटातून सीमा देव यांच्या अभिनयाला सुरूवात झाली. सुंदर व सुशिल अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती. सीमा देव (पूर्वाश्रमीच्या नलीनी सराफ) यांचा विविह रमेश देव यांच्याशी कोल्हापुरातील निंबाळकर यांच्या राजाराम टॉकीजमध्ये (ही टॉकीज आयोध्या म्हणून ओळखली जाते) 1963 साली झाला होता. या लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी देववाड्यात गेले होते. नाटक आणि चित्रपटांमुळे रमेश देव व सीमा देव यांचा जोशी यांच्या घराण्याशी संबंध होता.
दत्ता धर्माधिकारी, राजा परांजपे दिग्दर्शित चित्रपटात रमेश देव आणि सीमा देव यांची जोडी रसिकांच्या प्रसिध्दीस उतरली आहे. चित्रपटातील चित्रिकरणा दरम्यान सीमा आणि रमेश देव यांच्यात प्रेमसंबंध जुळले आणि त्यांनी अखेर कोल्हापुरातील आयोध्या टॉकीजमध्ये लग्न केले. कोल्हापुरात देव घराण्याचा बिंदू चौक सब जेलजवळ पूर्वीच्या काळी भलामोठा वाडा होता. देववाडा म्हणून त्याची ओळखल्या जाणाऱ्या वाड्यात त्या अनेकदा येत होत्या. चित्रिकरणासाठी कोल्हापुरात आल्या की त्या आवर्जुन आपले सासर असलेल्या देववाड्याला भेट द्यायच्या. त्याकाळी त्या टांग्यातून येत असल्याने त्यांना पाहण्यासाठी कोल्हापुरकर गर्दी करीत होते. सीमादेव यांनी हिंदी चित्रपटातही चरित्र अभिनेत्री म्हणून केले आहे. आपल्या कलाकारीने सीमा देव यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. देव पती-पत्नींची एव्हरग्रीन जोडी म्हणून चित्रपट सृष्टीत ओळख होती. रमेश देव यांच्या निधनानंतर त्या खचल्या होत्या. पतीच्या निधनानंतर दीड वर्षांनी सीमा देव यांनी दीर्घ आजारामुळे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाल्याच्या भावना कोल्हापुरकरांनी व्यक्त केल्या.
बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीतर्फे सीमा देव यांचा सत्कार
बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीच्या वतीने 2011 साली बाबुराव पेंटर फिल्म पुरस्काराने रमेश देव आणि सीमा देव यांना गौरवण्यात आले होते. याप्रसंगी रमेश देव व सीमा देव यांनी एकमेकांची प्रकट मुलाखत घेतली होती. या कार्यक्रमानंतर त्यांनी भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राला भेट दिली होती.
सीमा देव यांच्या 80 चित्रपटांपैकी गाजलेले चित्रपट
सीमा देव यांनी मराठी व हिंदी 80 चित्रपटात काम केले. परंतू आकाशगंगा, सुवासिनी, अपराध, या सुखांनो या, वरदक्षणा, मोलकरीण, हा माझा मार्ग ऐकला, यंदा कर्तव्य आहे, पाहू रे किती वाट आदी मराठी चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भुमिका साकारली. तर आनंद, कोशिष, कोरा कागज, सरस्वतीचंद्र हे चित्रपट अतिशय गाजले होते. या चित्रपटांची आजच्या तरूणाईलासुध्दा भुरळ घातली आहे.
न्यू बादशाही लॉजवर मुक्काम करायच्या
सीमा देव कोल्हापुरात चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी आल्या की शशिकांत जोशी यांच्या न्यू बादशाही लॉजवर मुक्काम करायच्या. न्यू बादशाही लॉजच्या मालकीन नलीनी जोशी व सीमा देव यांची गट्टी होती. चित्रिकरणानंतर नलीनी जोशी, सीमा देव, शांता आपटे, शांता शेळके यांच्यात दिलखुलास गप्पा रंगायच्या, अशी आठवण प्रतिज्ञा नाट्यारंगचे प्रशांत जोशी यांनी सांगितली.