गर्दी पाहता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये : प्रतिदिन अहवाल देण्याचा निर्देश
वृत्तसंस्था /देहरादून
10 मे रोजी चारधाम यात्रेस प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत अनेक भाविकांचा आरोग्यसंबंधी कारणांमुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर यात्रामार्गावर मोठी गर्दी झाल्याने व्यवस्थेवर ताण पडला आहे. आता या प्रकाराची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी गुरुवारी उत्तराखंडमधील चारधाम यात्रेची माहिती घेतली आहे. भल्ला यांनी राज्याच्या मुख्य सचिव राधा रतूडी यांना धाम, यात्रामार्ग आणि शिबिरांमधील भाविकांसंबंधीचा अहवाल प्रतिदिन गृह मंत्रालयाला पाठविण्याचा निर्देश दिला आहे. गृह सचिवांनी गरज भासल्यास यात्रामार्गावर गर्दी व्यवस्थापनासाठी एनडीआरएफ तसेच आयटीबीपीची मदत घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच भविष्यात चारधाम यात्रा व्यवस्थापनाच्या रणनीतिकरता एक समिती स्थापन करण्याचा निर्देश देण्यात आला आहे. प्रत्यक्ष मार्गावर यात्रा व्यवस्थावर बारकाईने देखरेख ठेवण्यावर गृह सचिवांनी भर दिला आहे. राज्यात चारधाम यात्रेत सर्व राज्यांमधून विशेषकरून उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक भाविक सामील होत असतात अशी माहिती राज्याच्या मुख्य सचिवांनी केंद्रीय गृह सचिवांना दिली आहे. नोंदणीकृत भाविकांची बडकोट (यमुनोत्री), हीना (गंगोत्री), सोनप्रयाग (केदारनाथ) तसेच पांडुकेश्वर (बद्रीनाथ)मध्ये तपासणी केली जात आहे. जानकी चट्टी (यमुनोत्री), गंगोत्री मंदिर (गंगोत्री), स्वर्गारोहिणी (केदारनाथ) तसेच आयएसबीटी आणि माणा (बद्रीनाथ)मध्ये धामांच्या दर्शनाकरता नोंदणीकृत भाविकांना टोकन जारी करण्यात येत आहे. मंदिराच्या परिसरात रांगेत असलेल्या भाविकांच्या टोकनवर मोहोर उमटवून त्यांच्यासाठी दर्शनाच व्यवस्था करण्यात आल्याचे राज्याच्या मुख्य सचिवांनी सांगितले आहे.









