कोल्हापूर :
चंद्र, शुक्र आणि शनि शुक्रवारी रात्री आकाशात एकत्र दिसले. त्यांच्या मनमोहक संगमाचे दृश्य पाहण्याचा आनंद नागरिकांनी घेतला. हे नयनरम्य दृश्य खगोलप्रेमींसाठी एक अनोखी संधी असल्याचे शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी सांगितले.
आजही चंद्र शनिच्या अधिक जवळ येणार आहे. जिथे आकाश मोकळं असेल, तेथून हे दृश्य पाहण्यासाठी उत्तम संधी असेल. शुक्राचा तेजस्वी प्रकाश आणि शनीची वलयं यामुळे हे दृश्य अधिक रोमांचक ठरणार आहे. खगोलप्रेमींना टेलिस्कोपद्वारे किंवा उघड्या डोळ्यांनी मनमोहक दृष्य पाहता येईल. अवकाशातील या मिलापाचा नागरिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ. व्हटकर यांनी केले आहे.
सुर्यास्तानंतर दोन तासांनी दर्शन
शुक्रवारी सायंकाळी दोन तासांनी चंद्र, शुक्र व शनि एकत्र येताना दिसले. अंधार पडल्यानंतर आकाशे निरभ्र असल्याने चंद्र, शुक्र व शनि अधिक जवळ आल्याचे दिसले. हा अनोखा क्षण टिपण्याचा योग खगोलप्रमींना मिळाला. आजही हा क्षण पाहण्याची संधी मिळणार आहे.








