पुणे / प्रतिनिधी :
पाकिस्तानला माहिती पुरविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) चे संचालक प्रदीप कुरुलकर यांनी केलेले कृत्य देशविघातक आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
पुण्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व अन्य नेते, अधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले, या घटनेबाबतचे सर्व पुरावे हे समोर आलेले आहे. मुळात हा अत्यंत गंभीर विषय आहे. त्यामुळे त्यांनी जे केले, त्याबद्दल कडक शासन हे झालेच पाहिजे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच हे प्रकरण फास्ट कोर्टवर घेण्यात यावे. त्यातूनच देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत जर कुणी चुकीचे काम करत असेल, तर त्याला माफी नाही, असा संदेश जाऊ शकतो.
वानखेडेप्रकरणी बोलताना ते म्हणाले, नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्याबाबत वारंवार सांगत होते. आत्ता जे नवाब मलिक बोलत होते, तेच सीबीआय बोलत आहे. मात्र, त्यावेळी वानखेडे यांचे समर्थन करणारे आत्ता बॅकफूटवर गेले आहेत. हे सीबीआयच्या माध्यमातून घडत आहे, ही आनंदाची बाब आहे. त्यांनी पारदर्शकपणे तपास करीत दूध का दूध, पाणी का पाणी करावे व लोकांच्या समोर सत्य आणावे.
महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभेबाबत 16 जागांसंदर्भात चर्चा झाली आहे. जागेच्या वाटपाबाबत चर्चा झालेली नाही. पुढील काळात यावर एकत्र बसून मार्ग काढण्यात येईल. पोपट, मैना, मोर कुणीही मेलेले नाही. सगळे जनतेसमोर आहे, असे सांगत कर्नाटकमधील पराभवानंतर कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी फडणवीस यांनी गोष्टीरूप भाषण केले असावे. त्यांना खरोखरच शिकवणी लावायची असेल, तर त्यांनी ती पवारसाहेबांकडे जरूर लावावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
निधीवाटपाबाबत तक्रार
पुणे जिल्हय़ातील 21 पैकी 13 जागा विरोधी पक्षाकडे, तर 9 सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. मागच्या वेळेस निधी वाटप करताना काही आमदारांवर अन्याय झाला. आम्ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार केली असून, यावर बैठकीत चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
तुळजापुरात जे घडले, ते आक्षेपार्ह
शालेय जीवनात असताना दहावीपर्यंत आम्हा सर्वांनाच हाफ पॅन्टवर जावे लागले. लहान मुलांनी हाफ पॅन्ट घातली म्हणून मंदिरात प्रवेश नाही, ही कुठली नवी पद्धत म्हणायची? कोणत्या देवाने अर्ध्या चड्डीवर दर्शन घेऊ नका, असे सांगितले. तुळजापूर येथे जे काही घडले, ते आक्षेपार्ह आहे. यात सरकारने तातडीने लक्ष घालावे, अशी सूचना त्यांनी केली.
..तर जनता सहन करणार नाही
महाराष्ट्र पुरोगामी राज्य असून, त्र्यंबकेश्वर व अन्य भागांत घडलेल्या घटना दुर्दैवी आहेत. यात राज्य सरकारची महत्त्वाची जबाबदारी आहे. कोणीही भावनिक मुद्दा पुढे करून धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर राज्यातील जनता ते कदापि सहन करणार नाही. राज्यातील सर्व जाती धर्मातील लोक हे गुण्या गोविंदाने राहत असताना जाणीवपूर्वक काही गोष्टी घडविण्यात येत आहेत. तथापि, समाजात तेढ निर्माण करणे चुकीचे असून, हे थांबविले पाहिजे, असेही पवार यांनी सुनावले.








