लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्कता
बेळगाव : सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बुधवारी बेळगाव विमानतळ प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग तसेच पोलिसांचा समावेश होता. येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका असल्याने यासंदर्भात आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. बेळगाव विमानतळाचे संचालक त्यागराजन यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रवाशांची संख्या वाढत असल्याने त्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात करणे गरजेचे आहे. कोणत्याही आपत्कालीन दुर्घटनेवेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक विभागाची जबाबदारी वाटून देण्यात आली. लोकसभा निवडणुकीवेळी विमानांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने तशा पद्धतीने व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी अग्निशमन, पोलीस, आरोग्य तसेच तेल कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.









