एस-400, राफेल विमाने, ब्राम्होस यांची नियुक्ती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा मुख्य भाग ईशान्य भारताशी जोडणाऱ्या आणि ‘चिकन नेक’ या नावाने परिचित असलेल्या चिंचोळ्या पट्टीत भारताने सुरक्षा व्यवस्था भक्कम केली आहे. बांगला देशकडून होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून या पट्टीचे संरक्षण करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. बांगला देशने काही दिवसांपूर्वी संपूर्ण ईशान्य भारत आपल्या नकाशात दाखवण्याचा उद्दामपणा केला होता. बांगला देशने कोणतेही दु:साहस केल्यास त्याला धडा शिकविण्यासाठी भारताने पूर्ण सज्जता केली असून या भागात एस-400, राफेल विमाने आणि ब्राम्होस क्षेपणास्त्र यांची पुरेशी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून दिली गेली.
चिकन नेक हा भारताचा भाग भारत आणि बांगला देश तसेच तिबेटच्या सीमेवर आहे. ईशान्य भारत भारतापासून तोडायचा असल्यास चिकन नेक भाग ताब्यात घ्यावा लागतो. बांगला देशमध्ये सध्या कट्टरवादाचे प्राबल्य आहे. त्यामुळे हा देश असे दु:साहस करण्याचा प्रयत्न करु शकतो. बांगला देशचे ईशान्य भारतावर लक्ष आहे, हे त्याच्या अलिकडच्या कृतींवरुन दिसून येत आहे. त्यामुळे भारताने सावधगिरीचा उपाय म्हणून ही संरक्षण व्यवस्था केल्याचे स्पष्ट केले गेले.
केवळ 22 किलोमीटर रुंदी
चिकन नेक भागाची रुंदी केवळ 22 किलोमीटर असून मुख्य भारताला ईशान्य भारताशी जोडणारा तो एकच मार्ग आहे. तो नेपाळ, भूतान, चीन आणि बांगला देश या चारही देशांच्या सीमांना लागून आहे. तो दक्षिणेतील सर्वात संवेदनशील ‘कोंडी बिंदू’ (चोक पॉईंट) म्हणून ओळखला जातो. बांगला देशाच्या सध्याच्या कट्टरवादी प्रशासनाने आता पाकिस्तानशी चुंबाचुंबीला प्रारंभ केल्याने भारतासमोरचा धोका वाढला आहे. म्हणून भारताने आता या भागाची सुरक्षा डोळ्यात तेल घालून करण्यास प्रारंभ केला असून आधुनिक शस्त्रास्त्रे तेथे नियुक्त केली आहेत.
चीनशी संगनमताचा प्रयत्न
बांगला देशने चीनशी संगनमत करण्याचा प्रयत्न चालविला आहे. चीनशी संरक्षण सहकार्य करार करण्याच्या दिशेने बांगला देशची पावले पडत आहेत. यामुळे या भागातील भू-राजकीय आणि संरक्षणविषयक समीकरणे नव्याने घडत आहेत. भारताने याची गांभीर्याने नोंद घेतली असून पुढच्या काळात या भागावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची योजना आहे, अशी माहिती सूत्रांकडून दिली गेली.
त्रिस्तरीय सुरक्षा
भारताने या पट्ट्यात त्रिस्तरीय सुरक्षा सुनिश्चित केली आहे. शत्रूकडून विमान हल्ला केला जाऊ शकतो, हे गृहित धरुन शत्रूची विमाने नष्ट करण्यासाठी आणि शत्रूवर प्रतिहल्ला चढविण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे. शत्रूने भूमीवरुन हल्ला करु नये, म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. बांगला देशने तरीही दु:साहस केलेच, तर मात्र, त्या देशाला सोडले जाणार नाही. त्याचा पूर्ण पाडाव केला जाईल, अशी व्यवस्था भारताने करुन ठेवावी, अशी मागणी केली जात आहे. भारताची कुरापत बांगला देशने काढल्यास ते प्रकरण त्या देशाला महाग पडेल, भारताची योजना असून ती साकारण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था या भागात नियुक्त करण्यात आली आहे. त्याच्याशिवाय ईशान्य भारतातही विविध स्थानांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येत असून शत्रूची कोंडी करण्यासाठी भारतीय सुरक्षा व्यवस्था सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले. बांगला देशने हल्ला केल्यास, त्या देशावरही निर्णायक प्रतिहल्ला केला जाईल, अशी सज्जता भारताने ठेवली आहे.









