ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शाईफेक प्रकरणानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पाटील यांच्या आजूबाजूला पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे. राज्य पोलिसांच्या सुरक्षेबरोबरच पाटील यांना CISF या केंद्रीय सुरक्षा दलाची देखील सुरक्षा आहे. त्यामध्ये देखील वाढ करण्याचा विचार सुरु आहे. पाटील यांच्या पुण्यातील घराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पाटील यांची गाडी ज्या रस्त्यावरून जाणार आहे, त्या रस्त्यावर वाहतूक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. पाटील आज पुण्यातील कर्वेनगर भागातील एका संस्थेला भेट देण्यासाठी येणार आहेत. त्यासाठी वारजे पोलीस स्टेशनचे 50 पोलीस, क्राईम ब्रांचचे पाच अधिकारी, वाहतूक पोलिसांचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत.
अधिक वाचा : खडसे राष्ट्रवादी संपवायला निघालेत
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वादग्रस्त विधान पाटील यांनी मागील आठवडय़ात केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, शनिवारी पाटील चिंचवडगावात एका कार्यक्रमासाठी आले असता यांच्या तोंडावर शाई फेकण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच बंदोबस्तातील 11 पोलिसांचेही निलंबन करण्यात आले आहे. माझ्या डोळय़ाला काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता. त्यामुळे डोळय़ाच्या आतील भागाचे मोठे ऑपरेशन करावे लागले होते. त्यावर शाई टाकली गेली. हा मला मारण्याचा प्रयत्न होता का?’ असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला होता.