शेजारच्या राज्यांमध्येही दक्षतेचा आदेश
वृत्तसंस्था/ चंदीगढ
पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाला प्रारंभ केला आहे. राज्य सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्याने हे आंदोलन होत आहे. हजारो शेतकरी पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगढमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याने 4,500 पोलीस चंदीगढला जाणाऱ्या मार्गांवर नियुक्त करण्यात आले आहेत.
सोमवारी शेतकरी आणि पोलीस यांच्या चकमकीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आंदोलन अधिकच चिघळले आहे. राज्य सरकारला धडा शिकविण्याचा निर्धार शेतकरी संघटनांच्या काही नेत्यांनी बोलून दाखविला असून त्यासाठी चंदीगढमध्ये आंदोलन आणि रास्तारोको करण्याची त्यांची योजना आहे. पंजाब सरकारने शेकडो शेतकऱ्यांना अटक केल्याचा दावा नेत्यांनी केला.
शेजारच्या राज्यांमध्येही सुरक्षा व्यवस्था
पंजाबला लागून असणाऱ्या हरियाणा आणि राजस्थानमध्ये आंदोलनाचे लोण पसरु नये म्हणून तेथील राज्य सरकारे दक्ष आहेत. पंजाबला लागून असणाऱ्या सीमावर्ती भागात या राज्यांच्या सरकारांनी पोलीस दल नियुक्त केले आहे. उत्तर प्रदेशातही दक्षता घेण्यात येत असून सुरक्षा सैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे आंदोलन 16 शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.
राज्य सरकारवर आरोप
पंजाबमधील शेतकरी आणि शेतमजूर यांच्या हितांचे रक्षण करण्यात राज्यातील आम आदमी पक्षाच्या सरकारला सपशेल अपयश आले आहे. पूर्वीपेक्षाही आता शेतकरी आणि शेतमजूर यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासने आता विसरण्यात आली असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आल्याचा आरोप शिरोमणी अकाली दलाचे नेते दलजीत सिंग चीमा यांनी केला. शेतकऱ्यांच्या अटकेचा त्यांनी निषेध केला.
हानीची भरपाई नाही
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांची घरे वाहून गेली असल्याने त्यांना उघड्यावर कुटुंबासह रहावे लागत आहे. पिकांचीही हानी झाली आहे. तथापि, राज्य सरकारने या हानीची भरपाई करुन देण्याचे आश्वासन पाळलेले नाही. दोनवेळा राज्य सरकारने आमची फसवणूक केली. आता आम्हाला आरपारची लढाई लढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. आमचे आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे अनेक शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले.









