बेळगाव : डोक्यात वार करून सिक्युरिटी गार्डचा निर्घृणरित्या खून करण्यात आल्याची घटना मंगळवार दि. 14 रोजी दुपारी 2.30 च्या दरम्यान एसजीबीआयटी इंजिनिअरिंग कॉलेजनजीक जुने सरकारी क्वॉर्टर्स गँगवाडी येथे उघडकीस आली. महादेव भीमाप्पा जोगी (वय 58) मूळचा कार्लकट्टी, ता. सौंदत्ती सध्या राहणार श्रीनगर असे मयताचे नाव आहे. घटनेची नोंद माळमारुती पोलीस स्थानकात झाली असून खून नेमका कशासाठी केला व कोणी केला? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. महादेव हे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत होते. रविवार दि. 12 रोजी दुपारी 2.30 च्या दरम्यान ते हिंडलगा गावातील फार्म हाऊसवर कामासाठी जात आहे असे सांगून घरातून बाहेर गेले होते. त्यानंतर पुन्हा घरी परतलेच नाहीत.
कुटुंबीयांनी फार्म हाऊसला संपर्क साधून विचारणा केली. पण महादेव हे कामावर आले नाहीत, असे सांगण्यात आले. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. पण कोठेच थांगपत्ता लागू शकला नाही. मंगळवारी दुपारी 2.30 च्या दरम्यान बसवराज चन्नबसाप्पा कडली यांनी मयत महादेव यांचा मुलगा बसवराज याला संपर्क साधून तुझे वडील एसजीबीआयटी कॉलेजनजीक जुन्या क्वॉर्टर्सजवळ पडून मृत झाले आहेत, असे सांगितले. लागलीच फिर्यादीने त्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली असता वडील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. अज्ञातांनी डोक्यात वर्मी वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर ही माहिती माळमारुती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून घेऊन पोलिसांनी तपास चालविला आहे.









