पाकिस्तानचे पाणी भारतात घुसले, रेंजर्स पातळीवरील बैठकीत मुद्दा उपस्थित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, फिरोजपूर
पंजाबमधील पुरामुळे भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरील 110 किमीपेक्षा जास्त लांबीच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे. सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 90 चौक्या पाण्यात बुडाल्या आहेत. याशिवाय, जम्मू आणि पंजाब दोन्ही राज्यांचे सीमावर्ती भाग पुरामुळे बाधित आहेत. बीएसएफने एक मोठी पुनर्बांधणी मोहीम सुरू केली आहे.
सततच्या पावसामुळे आणि पुरामुळे पंजाबमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. पंजाबमधील सर्व 23 जिह्यांमधील 1400 हून अधिक गावे पुरामुळे बाधित आहेत. अशा परिस्थितीत पंजाब सरकारने राज्याला आपत्तीग्रस्त घोषित केले आहे. पंजाबमधील फिरोजपूर येथील भारत-पाकिस्तान सीमेवरील अनेक किलोमीटर लांबीचे कुंपण पाण्यात बुडाले आहे. पाकिस्तानकडून येणारे पुराचे पाणी सीमेवरून भारतीय हद्दीत घुसल्यामुळे बरेच नुकसान झाले आहे. भारतीय सीमाभागातील 14 एस माझीवाला गावातील शेतात पाकिस्तानचे पाणी घुसल्यानंतर तेथील शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. पाकिस्तानचा सादकी कालवा फुटण्याची भीती असल्याने त्यांनी तातडीने बीएसएफ आणि इतर सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे दुपारी पाण्याचा प्रवाह थांबवता आला.
भारत-पाकिस्तान सीमा भागातील कुंपणाजवळ 14 एस माझीवाला गावातील शेतात बरेच पाणी दिसून येत होते. 10 ते 15 बिघा शेतात पुराचे पाणी पाहून शेतकऱ्यांनी तातडीने बीएसएफ आणि सुरक्षा यंत्रणांशी संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती दिल्याचे सांगण्यात आले. उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, बीएसएफ अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी रेंजर्ससोबत बैठक घेत पाकिस्तानकडून येणाऱ्या पाण्याविरुद्ध आपला निषेध नोंदवल्यानंतर हे पाणी थांबवण्यात आले. शेतकरी जसविंदर सिंग चोप्रा, गुरमीत सिंग, ठाकूर सिंग, सुखचैन सिंग आणि मंगल सिंग यांनी पाकिस्तानमध्ये सध्या पूरसदृश परिस्थिती असल्याचे सांगितले.
काश्मीरचा देशाच्या इतर भागाशी संपर्क तुटलेला
गुरुवारी काश्मीरमध्ये पाऊस आणि भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते वाहून गेल्यामुळे खोऱ्याचा देशाच्या इतर भागाशी संपर्क तुटला आहे. झेलम नदीची पाण्याची पातळी कमी झाली आहे. नदी आता धोक्याच्या चिन्हाखाली वाहत आहे. तथापि, खबरदारी म्हणून काश्मीर भागातील शाळा आणि महाविद्यालये शनिवार, 6 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. जम्मूच्या रामबन जिह्यात मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे 283 घरांचे नुकसान झाले. 950 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.









