सीईओ कार्तिकेयन एस यांची माहिती
सर्व शाळांना सीसीटीव्ही बसविणारा कोल्हापूर राज्यात पहिला जिल्हा
लोकसहभागातील साडेचार कोटी निधीतून ‘मिशन सुरक्षा कवच’ उपक्रम पूर्ण
कोल्हापूर
बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर शाळांतील सुरक्षेचा प्रश्न प्रकर्षाने पुढे आला. त्यानुसार जिह्यातील शाळा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना जिल्हा परिषदेने ‘मिशन शाळा कवच’ हे अभियान राबविले असून 1958 इतक्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविले आहेत. यासाठी शासकीय निधी न वापरता लोकसहभागातून साडेचार कोटी रूपयांच्या निधीतून हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमात महाराष्ट्रात पहिला येण्याचा बहुमान कोल्हापूरला मिळाला असल्याची माहिती सीईओ कार्तिकेएन एस आणि शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कार्तिकेएन एस म्हणाले, जिल्हा नियोजनमधून या उपक्रमास निधी मिळणे तसे कठीण होते किंवा मिळाला असता तरी एका वेळी एवढा निधी मिळणेही अवघड होते. शिवाय निर्धारीत वेळेचे बंधन पाळून उपक्रम यशस्वी करणे हे उद्दीष्ठ समोर होते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सहभागाचे आवाहन केले. ग्रामपंचायत विभागाची मदत घेतली. माजी विद्यार्थ्यांनी आपले योगदान दिले. त्यामुळे कमी कालावधीत हा उपक्रम यशस्वी झाला. राज्यात सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणारा जिल्हा म्हणून आपल्या जिह्याची नोंद हेईल.
सीइओ कार्तिकेयन एस म्हणाले, या उपक्रमासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधूरी मिसाळ, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, गटविकास अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक, नागरिकांचे उत्स्फुर्त सहकार्य मिळाले. योजनेचे विकेंद्रीकरण केल्यामुळे एवढे मोठे यश मिळाले. आणि सीसीटीव्ही बसविणे ही लोकचळवळ बनली.
1 लाख 44 हजार विद्यार्थ्यांना सुरक्षा कवच
कार्तिकेएन एस म्हणाले, ‘संकल्पपूर्ती विद्यार्थी सुरक्षेची’ हे ध्येय ठेऊन ‘मिशन शाळा कवच’ या अभियानांतर्गत जिह्यातील 1958 शाळांमध्ये 7832 हून अधिक कॅमेरे बसविण्यात आले. सुमारे 1 लाख 44 हजार 324 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांना एक प्रकारचे सुरक्षा कवच मिळाले आहे. गुणवत्ता असणारे कॅमेरे, बॅकअप, स्टोअरेज आदी तांत्रिक बाबींचाही विचार या उपक्रमामध्ये करण्यात आला आहे
भविष्यात कॅमेऱ्यांची संख्या वाढविणार
कालबद्ध कार्यक्रमाचे नियोजन करून या उपक्रमात सहभागी असण्रायां सर्व घटकांना प्रशिक्षण देवून हे अभियान यशस्वी केले. यामुळे 76 व्या प्रजासत्ताक दिन साजरा करताना कोल्हापूर जिह्याची सुरक्षीत जिल्हा म्हणून नवी ओळख निर्माण होईल. भविष्यात कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात येईल. विशेष म्हणजे इंटरनेटची सेवा सक्षमपणे मिळाली तर तालुका स्तरावर ही कोणत्या शाळेत काय चालले आहे हे पाहता येईल असेही कार्तिकेएन एस यांनी सांगितले.
Previous Articleलिबिया लोबो सरदेसाई यांना पद्मश्री
Next Article मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकामांवर फिरवला बुलडोझर








