60 किमी मार्गावर 35 हजार सैनिक तैनात : 4 हजार कॅमेऱ्यांची नजर
वृत्तसंस्था/ श्रीनगर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर यावर्षी अमरनाथ यात्रा इतिहासातील सर्वात कडक सुरक्षेत पार पडणार आहे. यंदा 60 किमीच्या दोन्ही प्रवास मार्गांवर 35 हजार सैनिक तैनात केले जातील. याशिवाय, जम्मू ते पवित्र गुहेपर्यंतची सुरक्षा 1 लाख सैनिक सांभाळतील. दोन्ही मार्गांवर उच्च रिझोल्यूशन आणि चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानासह 4 हजार सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवतील. हे कॅमेरे 6 नियंत्रण कक्षांशी जोडले जातील. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत देशभरातून 4 लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे.
जम्मूपासून पवित्र गुहेपर्यंत जाण्यासाठी दोन प्रवास मार्ग आहेत. पहिला मार्ग बालटाल मार्ग म्हणून ओळखला जातो. हा मार्ग बेस कॅम्पपासून गुहेपर्यंत 14 किमी लांबीचा आहे. तर दुसरा पहलगाम मार्ग बेस कॅम्पपासून गुहेपर्यंत 46 किमी लांब आहे. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाचे अधिकारी पहलगाम आणि बालटाल दोन्ही मार्गांवर ट्रॅक साफ करण्यासाठी आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांसोबत काम करत आहेत. बालटाल मार्गावरून बालटाल, निलग्रथ डोमेल, ब्रारी मार्ग, संगम, लोअर केव्ह आणि होली केव्ह येथे कॅम्प उभारले जात आहेत. पहलगाम मार्गावरील नंदीवन, चंदनवाडी, पिसू टॉप, शेषनाग आणि पंचतरणी येथेही भाविकांसाठी विशेष तळ उभारण्यात येत आहेत. यामध्ये बालटाल आणि नंदिवान बेस कॅम्प येथे दोन नवीन यात्री भवनांचे बांधकाम समाविष्ट आहे.
श्रीनगरमधील पांथाचौक येथे असलेल्या सहा मजली यात्री निवासातील आणखी दोन मजल्यांचे बांधकाम यावर्षी सुरू होणार आहे. त्याची क्षमता 1,000 लोकांची आहे. स्वच्छता सेवांचे काम ग्रामीण विकास विभागाकडे सोपवण्यात आले आहे. मार्गावर एकूण 5,000 शौचालये बसवली जात आहेत. येथील स्वच्छतेसाठी 2000 कामगार तैनात केले जातील.
जूनपासून हेलिकॉप्टर बुकिंग सुरू
सुरक्षेव्यतिरिक्त यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी तयारी देखील सुरू आहे. यात्रेकरूंच्या सोयीसाठी हेलिकॉप्टर सेवाही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. चंदनवाडी मार्गावर श्रीनगर ते पहलगाम आणि पहलगाम ते पंचतरणी हेलिकॉप्टर उ•ाणे चालतील. बालटाल मार्गावर, हेलिकॉप्टर श्रीनगरहून नीलग्रथ बालटाल आणि नंतर पंचतरणीला जातील. या सेवांसाठी बुकिंग जूनमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.









