तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था / चेन्नई
धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलॅरिझम ही परकीय संकल्पना असून भारतात ती उपयुक्त ठरणार नाही, असे विधान तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी केले आहे. कन्याकुमारी येथे एका जनकार्यक्रमात भाषण करताना त्यांनी हे विधान सोमवारी केले. सध्याच्या काळातील धर्मनिरपेक्षता ही सत्याधारित नसून तो एका कटकास्थानाचा भाग आहे, अशा अर्थाचे विधानही त्यांनी यावेळी केले.
परकीय सत्ताधीशांनी भारताच्या जनतेविरोधात अनेक कारस्थाने पेलेली आहेत. धर्मनिरपेक्षता या उदात्त तत्वज्ञानाचा विपरीत अर्थ लावून तो समाजात रुजविणे, हे परकीय सत्तांचे ध्येय होते. भारताच्या जनतेविरुद्ध रचण्यात आलेले हे एक व्यापक आणि घातक कारस्थान होते. सध्याची धर्मनिरपेक्षता ही युरोपियन संकल्पना असून ती त्या देशांमध्ये विशिष्ट परिस्थितीत निर्माण झाली, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सत्ता विरुद्ध धर्म
युरोपात मध्ययुगात राजसत्ता विरुद्ध धर्म असा संघर्ष झाला होता. या संघर्षातून ही संकल्पना निर्माण झाली. राजसत्तेवरचा धर्माचा प्रभाव झुगारुन देण्यासाठी राजसत्तेनेच या संकल्पनेला खतपाणी घातले होते. धर्माचा आणि चर्चचा प्रभाव कमी झाल्यास आपली राजसत्ता सुरक्षित राहील, अशी युरोपातील राजघराण्याची भावना होती. त्यामुळे धर्माविरुद्धचे शस्त्र म्हणून धर्मनिरपेक्षतेचा उपयोग करण्यात राजसत्ता आघाडीवर राहिली. भारतात धर्म विरुद्ध राजसत्ता असा संघर्ष कधी नव्हता. त्यामुळे अशा संघर्षातून निर्माण झालेल्या या तत्वज्ञानाचा भारतात फारसा उपयोग नाही. भारत धर्मापासून दूर राहू शकत नाही, असे विधान त्यांनी केले.
विरोधी पक्षांची टीका
त्यांच्या या विधानावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. त्यांचे विधान भारताच्या राज्यघटनेच्या विरोधात असून ते स्वीकारार्ह नाही. धर्मनिरपेक्षता भारतातील संकल्पना आहे. अनेक नेत्यांनी या संकल्पनेच्या आधारे आपली कार्ये केली आहेत, अशी प्रतिक्रिया अनेक धर्मनिरपेक्ष नेत्यांनी व्यक्त केली आहे.









