पुणे / प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अभूतपूर्व फुटीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांची पुण्यात गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी एकच खळबळ उडाली. उद्योगपती अतुल चोरिडिया यांच्या निवासस्थानी झालेल्या या तीन तासांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील समजू शकला नसला, तरी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील संवाद कायम असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादीतील बंड, अजित पवारांनी भाजपासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यांची उपमुख्यमंत्रिपदावर झालेली निवड यामुळे राष्ट्रवादीत सरळसरळ शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले आहेत. शनिवारी हे दोन्ही नेते पुण्यात होते. शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या कार्यक्रमाला सकाळी उपस्थित होते. त्यानंतर पवार यांनी दुपारी बाराच्या सुमारास आपला मोर्चा कोरेगाव पार्कच्या दिशेने वळविला व निकटवर्तीय उद्योगपती उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी ते दाखल झाले. अजितदादा हेदेखील चांदणी चौकातील उड्डाणपूलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. पुणे मेट्रोतूनही त्यांनी सफर केली. त्यानंतर त्यांचा ताफा सर्किट हाऊसकडे आला. मात्र, ताफा तिथेच सोडून अजितदादांनीही चोरडिया यांच्या घराची वाट धरली. साधारणपणे दुपारी दोनच्या सुमारास ते याठिकाणी पोहोचले. त्यानंतर पवार काका-पुतण्यांमध्ये भेट झाली. या भेटीचा व त्यातील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही या वेळी उपस्थित होते. त्यामुळे या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे मानले जात आहे.
कॅमेऱ्यापासून लपण्याचा दादांचा प्रयत्न?
त्यानंतर पावणे पाचच्या सुमारास पवार येथून बाहेर पडले. यादरम्यान जयंत पाटील व अजितदादा आतमध्येच होते. साधारण सहा वाजून 35 मिनिटांच्या आसपास जयंत पाटीलही येथून निघाले. त्यानंतर पावणे सातला वेगळय़ा वाहनातून अजितदादा बाहेर पडले. मात्र, त्यांचा गाडीत डुलकी लागलेल्या अवस्थेतील व्हिडिओ माध्यमांमध्ये व्हायरल झाला. ही गाडी जाताना गेटला धडकली. मात्र, चालकाने न थांबता पुढे दामटल्याचेही दिसून आले. त्यामुळे कॅमेऱ्यापासून लपण्याचा त्यांचा प्रयत्न होता का, असा सवाल उपस्थित होत आहे.
दादांचा आवारातील सुस्पस्ट व्हिडिओही समोर
दुसरीकडे प्रत्यक्ष अजितदादांचा बंगल्याच्या आवारात शिरतानाचा अगदी सुस्पष्ट व्हिडिओही समोर आल्याने राजकीय वर्तुळाला दुसरा धक्का बसला. तथापि, चोरडिया यांनी अजितदादा निवासस्थानी आल्याचे वृत्त नाकारले आहे. मात्र, शरद पवार हे आपल्या निवासस्थानी भोजनासाठी आले होते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार व शरद पवार यांची भेट झाली, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
भेटीचे गूढ कायम
या भेटीत काय चर्चा झाली?, यामागे कारण काही करण होते? दोघांमध्ये खरेच काही चर्चा झाली का? याचे उत्तर मिळू न शकल्याने भेटीचे गूढ कायम आहे. मात्र, यातून दोन्ही गटातील संवाद कायम असल्याचेही स्पष्ट झाले. या भेटीतून राज्याच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळणार काय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.
भेटीबाबत माहिती नाही : अमोल मिटकरी
दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. असे काही फोटो आलेले नाहीत. भेट झालीच असेल, तर ती पारिवारिक स्वरुपाची असेल. राजकारणाचा प्रश्न येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खरे काय ते पवारांनी सांगावे : पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या भेटीबाबत संबंधित वृत्तवाहिनीकडे आपली प्रतिक्रिया नोंदविली. खरेच भेट घेतली का, याबाबत काही सांगता येणार नाही. मात्र, खरे काय ते महाराष्ट्रातील जनतेला पवारसाहेबांनी सांगितले पाहिजे, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.
भेटीतून संभ्रमाची स्थिती : दानवे
या भेटीतून अर्थ काढणे मुश्कील आहे. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तर यातून कार्यकर्त्यांमधील संभ्रम वाढत असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.








