आमदार जयंत आसगावकर यांची पत्राद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
सांगरुळ / वार्ताहर
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना सहकार क्षेत्रातील निवडणुकीची कामे देण्यात आली आहेत, मात्र या काळात स्कॉलरशिप परीक्षा, सराव परीक्षा व घटक परीक्षा असल्याने या कामातून त्यांना त्वरित वगळावे, अशी मागणी आज आमदार जयंत आसगावकर यांनी पत्राद्वारे केली. मागणीचे पत्र प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांना देण्यात आले.
ज्या शिक्षकांना निवडणुकीची कामे दिलेली आहेत, अशांची यादी सादर करा. त्यांची कामे रद्द करू, असे आश्वासन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी कांबळे यांनी आमदार जयंत आसगावकर यांना दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील, कोल्हापूर मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील, सहसचिव अजित रणदिवे, महाराष्ट्र शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण मुजुमदार पोपट पाटील, बाजीराव साळवी, के. एस. पोतदार, संदीप पाथरे उपस्थित होते.
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, लोकसभा निवडणूक असो वा विधानसभा निवडणुक. आमचे शिक्षक बांधव आपले काम प्रामाणिकपणे बजावतात. याशिवाय जनगणना, बीएलओ अशा अनेक कामगिरी शिक्षकांना दिल्या जातात. आज बऱ्याच शाळेत शिक्षकांच्या जागा रिक्त आहे. या सर्वांचा परिणाम शैक्षणिक दर्जांवर होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
निवडणूक कार्यालयाकडून नुकतेच शिक्षकांना सहकार क्षेत्रातील निवडणुक कामाचे आदेश देण्यात आलेले आहे. सध्याचे दिवस हे पाचवी ते आठवी स्कॉलरशिप परीक्षा, एनएमएमएस परीक्षा, १० वी व १२ वी सराव व बोर्ड परीक्षा होऊ घातलेले आहेत. यास्तव शिक्षकांना कुंभी-कासारी व अन्य निवडणुकीची जी जबाबदारी दिली आहे, त्यातून तात्काळ मुक्त करण्यात यावे. तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात, अशी मागणी केली.