परीक्षा केंद्रांबाहेर राहणार जमावबंदी
प्रतिनिधी / बेळगाव
बारावीची परीक्षा शुक्रवार दि. 22 एप्रिलपासून सुरू होत आहे. यापार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांबाहेर जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी हा आदेश जारी केला आहे.
22 एप्रिल ते 18 मे पर्यंत बेळगावसह राज्यात बारावीची परीक्षा होणार आहे. राज्य सरकारने दहावीप्रमाणेच या परीक्षेच्यावेळीही विद्यार्थ्यांसाठी गणवेश सक्तीचा केला असून हिजाबवर बंदी असणार आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांपासून 200 मीटर अंतरापर्यंत जमावबंदी असणार आहे. सीआरपीसी कलम 144 अन्वये परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्रांबाहेर जमावबंदी असणार आहे. रोज सकाळी 10.15 ते 1.30 पर्यंत बारावीची परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्रांबाहेर जमाव जमू नये, शस्त्रs, स्फोटके बाळगू नयेत, विद्यार्थ्यांना गैरप्रकार करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने कोणी या परिसरात येऊ नये, परीक्षा केंद्रांजवळ फटाके उडवू नयेत, सरकारी व इतर वाहने अडवू नयेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱयांनी केल्या आहेत.
परीक्षा केंद्रांपासून 200 मीटर अंतरातील झेरॉक्स व कॉम्प्युटर सेंटर बंद करण्याचा आदेश दिला आहे. विद्यार्थी, शाळा-कॉलेजचे कर्मचारी, परीक्षेच्या कामासाठी सरकारने नियुक्त केलेले अधिकारी, पोलीस वगळता इतरांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश बंदी असणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.
राज्यात 1,076 केंद्रांवर बारावी परीक्षा
बेंगळूर : राज्यात बारावी परीक्षेला दि. 22 पासून प्रारंभ होत आहे. परीक्षा सुरळीत होण्यासाठी पदवीपूर्व शिक्षण खात्याने तयारी पूर्ण केली आहे. 18 मे पर्यंत चालणाऱया या परीक्षेसाठी 7 लाख 84 हजार 255 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी राज्यभरात 1,076 केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. परीक्षेला 6,00519 नियमित विद्यार्थी तर 61,808 रिपिटर्स विद्यार्थी बसणार आहेत. याशिवाय 21,928 बहिस्थ विद्यार्थ्यांनीही नोंदणी केली आहे. कॉपीसारख्या अवैध प्रकारांना चाप लावण्यासाठी परीक्षा केंद्रांपासून 200 मीटर पर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यभरात 2152 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तसेच तालुका पातळीवर 858 आणि जिल्हा पातळीवर 74 भरारी पथके असतील. परीक्षेवेळी हिजाबला परवानगी नाही. त्यामुळे हिजाब किंवा धार्मिक संकेत असणारे कपडे परिधान करून येणाऱया विद्यार्थ्यांना परीक्षा खोलीत बसू दिले जाणार नाही. दरम्यान, हिजाब घालून वर्गात बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करून उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या उडुपीतील 6 विद्यार्थिनी परीक्षेला हजर होतात का?, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. हिजाबवरून वाद निर्माण झाल्यानंतर या विद्यार्थिनी एकही दिवस वर्गात हजर झाल्या नव्हत्या.









