न्यूझीलंड 4-0 गोल्सनी पराभूत, चिलीचा निसटता पराभव
वृत्तसंस्था/ राऊरकेला
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत सोमवारी क गटातील झालेल्या सामन्यात नेदरलँड्सने न्यूझीलंडचा 4-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. तर याच गटातील दुसऱया एका सामन्यात मलेशियाने चिलीवर 3-2 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळवून स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.
आतापर्यंत तीनवेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱया नेदरलँड्सने या स्पर्धेत आपला दुसरा विजय नोंदविला आहे. या विजयामुळे क गटात नेदरलँड्सचा संघ दोन सामन्यातून 6 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. या कामगिरीमुळे नेदरलँड्स संघाला उपांत्यफेरीसाठी थेट प्रवेश मिळण्याची शक्मयता आहे. या गटात न्यूझीलंडचा संघ दोन सामन्यातून 3 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. न्यूझीलंडने एक सामना जिंकला असून एक सामना गमावला आहे.
सोमवारच्या क गटातील नेदरलँड्स आणि न्यूझीलंड यांच्यातील लढतीमध्ये नेदरलँड्सच्या हॉकीपटूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर देत न्यूझीलंडवर दडपण आणले. न्यूझीलंडचा कर्णधार ब्रिंकमॅनने दुसऱयाच मिनिटाला नेदरलँडचे खाते उघडले. जेप होडमेकर्सकडून मिळालेल्या पासवर कर्णधार ब्रिंकमनने न्यूझीलंडच्या बचावफळीतील खेळाडूंना तसेच गोलरक्षकाला हुलकावणी देत मैदानी गोल नोंदविला. चौथ्या मिनिटाला न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्याचा लाभ न्यूझीलंडच्या मॉरिसनला घेता आला नाही. 12 व्या मिनिटाला नेदरलँड्सचा दुसरा गोल कर्णधार ब्रिंकमनने केला. ब्रिंकमनचा हा वैयक्तिक दुसरा गोल होता. व्हॅम हिजेनगेनने दिलेल्या पासवर ब्रिंकमनने आपल्या संघाचा हा दुसरा मैदानी गोल केला. या दुसऱया गोलनंतर नेदरलँड्सला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण न्यूझीलंडच्या गोलरक्षकाने तो थोपविला. सामन्यातील दुसऱया पंधरा मिनिटांच्या कालावधीत नेदरलँड्सने आपले पूर्ण वर्चस्व राखले होते. 19 व्या मिनिटाला बिजेन कोएनने नेदरलँड्सचा तिसरा गोल केला. 20 व्या मिनिटाला नेदरलँड्सला आणखी एक पेनल्टी कॉर्नर उपलब्ध झाला. पण न्यूझीलंडच्या गोलरक्षकाने नेदरलँड्सला आघाडी वाढविण्यापासून रोखले. सामन्याच्या मध्यंतरावेळी नेदरलँड्सने न्यूझीलंडवर 3-0 अशी भक्कम आघाडी मिळविली होती. सामन्याच्या तिसऱया पंधरा मिनिटांच्या कालावधीत नेदरलँड्सने आक्रमक चाली केल्या. पण त्यांना गोल नोंदविता आला नाही. 54 व्या मिनिटाला व्हॅन डॅमच्या पासवर जेप हुडमेकर्सने नेदरलँड्सचा चौथा आणि शेवटचा गोल करून न्यूझीलंडचे आव्हान 4-0 असे एकतर्फी संपुष्टात आणले. या संपूर्ण सामन्यात न्यूझीलंडला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. पण त्याचा लाभ त्यांना घेता आला नाही. आतापर्यंत तीनवेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱया नेदरलँड संघातील खेळाडूंनी आपल्या अचूक पासवर अधिक भर दिला होता. नेदरलँड संघाचा न्यूझीलंडवरील हा 25 वा विजय आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत चार सामन्यात नेदरलँड्सचा पराभव केला आहे. उभय संघातील पाच सामने अनिर्णित राहिले होते. सोमवारच्या सामन्यात नेदरलँड्सचा कर्णधार ब्रिंकमनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
मलेशियाचा निसटता विजय
या स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या क गटातील दुसऱया सामन्यात मलेशियाने चिलीचा 3-2 असा निसटता पराभव करत स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत राखले आहे. या विजयामुळे मलेशियाने क गटात तिसऱया स्थानावर झेप घेतली आहे. या गटात चिलीचा संघ शेवटच्या स्थानावर असून त्यांना आपले खाते उघडता आलेले नाही. चिलीला दोन्ही सामन्यांपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही.
या सामन्यात पहिल्या पंधरा मिनिटांच्या कालावधीत मलेशियन संघातील अशेरीने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर चिलीच्या बचावफळीवर चांगलेच दडपण आणले. या कालावधीत अशेरीचा गोल केवळ काही इंचाने हुकला. सामना सुरू झाल्यानंतर दुसऱयाच मिनिटाला अशेरीने चिलीच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली आणि त्याने मारलेला फटका गोलपोस्टच्या दांडीला आदळून बाहेर गेल्याने मलेशियाला खाते उघडता आले नाही. आठव्या मिनिटाला चिलीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण मलेशियाच्या गोलरक्षकाने चिलीचा हा हल्ला थोपविला. पहिल्या पंधरा मिनिटात उभय संघांकडून खाते उघडले गेले नाही.
या सामन्यातील दुसऱया पंधरा मिनिटांच्या कालावधीत मलेशियाने आपल्या खेळाच्या डावपेचात अधिकच बदल करत चिलीच्या मधल्या फळीतील खेळाडूंवर दडपण आणले. दरम्यान, मलेशियाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. या पेनल्टी स्ट्रोकवर मलेशियाच्या खेळाडूने मारलेला फटका चिलीच्या बचावफळीतील खेळाडूच्या गुडघ्यावर आदळला. चिलीच्या या हॉकीपटूला या दुखापतीमुळे तातडीने मैदान सोडावे लागले. 19 व्या मिनिटाला चिलीला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यांच्या ऍमरोसो ज्युआनने चिलीचे खाते उघडले. या प्रति÷sच्या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होणाऱया चिलीने मलेशियावर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या गेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत मलेशियाने चौथे स्थान मिळविले होते. 25 व्या मिनिटाला मलेशियाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि त्यांच्या रहिम रेझाईने शानदार गोल नोंदवून आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. मलेशियाला ही आघाडी अधिक वेळ राखता आली नाही. सामन्यातील 28 व्या मिनिटाला मार्टिन रॉड्रिग्जने डाव्या बगलेतून चेंडूवर ताबा मिळवत मलेशियाच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली आणि त्याने मलेशियाचा गोलरक्षक ओथमनला हुलकावणी देत पुन्हा आपल्या संघाला 2-1 असे आघाडीवर नेले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत चिलीने मलेशियावर 2-1 अशी आघाडी मिळविली होती.
सामन्याच्या तिसऱया सत्रात मलेशियाला अधिक पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. 40 व्या मिनिटाला मलेशियाच्या हमसेनी अशरनने मैदानी गोल नोंदवित मलेशियाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. 41 व्या मिनिटाला एन. सुमंत्रीने मैदानी गोल करून मलेशियाला 3-2 असे आघाडीवर नेले. या तिसऱया पंधरा मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघातील प्रत्येकी एका खेळाडूला पंचांनी पिवळे कार्ड दाखविले. सामन्याच्या शेवटच्या पंधरा मिनिटांच्या कालावधीत चिलीला बरोबरी करण्याची संधी मिळाली होती. त्यांचा कर्णधार व्हॅलेन झुएलाने मलेशियाच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली, पण त्याला गोल नोंदविता आला नाही. या कालावधीत मलेशियाच्या एका खेळाडूला पंचांनी पिवळे कार्ड दाखवून पाच मिनिटांसाठी मैदानाबाहेर काढले. 54 व्या मिनिटाला अमरोसो ज्युआंटला हिरवे कार्ड दाखवित त्याला मैदानाबाहेर जाण्याचा आदेश दिला. त्यामुळे चिलीला या सामन्यातील शेवटच्या पाच मिनिटांच्या कालावधीत दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले. या सामन्यात मलेशियाच्या सुमंत्रीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
सामन्याचे निकाल
हॉलंड वि. वि. न्यूझीलंड 4-0
मलेशिया वि. वि. चिली 3-2
आजचे सामने
1) कोरिया वि. जपान
वेळ ः सायं. 5 वा.
2) जर्मनी वि. बेल्जियम
वेळ ः सायं. 7 वा.
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स फर्स्ट,
सिलेक्ट 2 एचडी, सिलेक्ट 2 एसडी.









