पुणे / प्रतिनिधी :
Second victim of ‘sextortion’ in Pune पुण्यात सेक्सटॉर्शनला बळी पडण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सोशल मीडियावर मुलींच्या नावाने चॅटिंग करून तरुण मुलांना जाळय़ात ओढायचे, त्यांच्याबरोबर व्हिडिओ कॉलिंग करून अर्धनग्न होण्यास सांगून त्याचे स्क्रीन शॉट काढून ब्लॅकमेल करायचे, अशी साधारण आरोपींची कार्यपद्धती असून, या त्रासाला कंटाळूनच दत्तवाडी, सहकारनगर भागातील दुसऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शंतनू (वय 19) असे या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या भावाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे. हा प्रकार दत्तवाडीमधील एका सोसायटीत 28 सप्टेंबर रोजी दुपारी घडला होता. अशीच एक घटना धनकवडीमध्ये 30 सप्टेंबर रोजी घडली होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ इंस्टाग्राम आयडीवरुन एका अनोळखी प्रित यादव नावाच्या आयडीवर चॅटिंग करीत होता. त्यांच्या भावाचे अर्ध नग्न फोटो तिने पाठविण्यास सांगितले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिने त्याच्याकडून 4 हजार 500 रुपये फोन पेवरून घेतले होते. त्यानंतरही धमकी देऊन वारंवार पैशांची मागणी केली जात होती. या त्रासाला कंटाळून शंतनू याने 28 सप्टेंबर रोजी घराच्या इमारतीवरून खाली उडी मारून आत्महत्या केली. फिर्यादी यांनी अंत्यसंस्कार व सर्व विधी केल्यानंतर बुधवारी याबाबत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे पुढील तपास करत आहे.
अधिक वाचा : खडसेंचे पोलीस ठाण्यात रात्रभर ठिय्या आंदोलन
यापूर्वी ही असाच घडला गुन्हा
ऑनलाइन ओळख झालेल्या तरुणीने तरुणाचा नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत सातत्याने खंडणीची मागणी केल्याने धनकवडी येथील अमोल नावाच्या एका तरुणाने 30 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अमोल यानेही या तरुणीच्या धमकावणीनंतर तिला साडेचार हजार रुपये पाठविले होते. तिच्या सततच्या त्रासामुळे अमोल याने तिला ‘मै सुसाईड क रहा हू’, असा संदेश पाठविला होता. त्यावर तिने ‘करो सुसाईड, मै सोशल मीडियापर व्हिडिओ व्हायरल कर रही हू,’ अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.