नवोदित व अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष
वृत्तसंस्था/ अनंतपूर
राष्ट्रीय निवड समितीने दुर्लक्ष केलेले रिंकू सिंगसारखे नवे खेळाडू व काही अनुभवी खेळाडू आजपासून सुरू होणाऱ्या दुलीप करंडक ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतील.
नव्या मोसमाची सुरुवात दुलीप ट्रॉफी स्पर्धेने होते. या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यांत काही स्टार खेळाडूंना राष्ट्रीय संघाच्या शिबिरासाठी सोडण्यात आल्याने त्याची थोडीशी स्टार व्हॅल्यू कमी झालेली आहे. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटीसाठी त्यांना सोडण्यात आले असून या संघातील फक्त सरफराज खान दुलीप करंडक सामन्यात खेळताना दिसेल. राष्ट्रीय संघातील नियमित खेळाडूंच्या गैरहजेरीत रिंकूसारख्या नवोदित खेळाडूंवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यात येईल. विशेष म्हणजे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करूनदेखील रिंकूला या स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी निवडण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. राष्ट्रीय टी-20 संघातून खेळतानाही त्याने चांगले प्रदर्शन केले आहे.
शुभमन गिल राष्ट्रीय संघात सामील झाल्याने मयांक अगरवालकडे इंडिया अ संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. 2022 मध्ये अगरवालने देशातर्फे शेवटची कसोटी खेळली होती. पुनरामनासाठी त्याला आता भरपूर धावा करून लक्ष वेधून घ्यावे लागणार आहे. पहिल्या फेरीत न खेळलेला वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची इंडिया अ संघात निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा विचार करून त्याच्या कामगिरीवर निवड समितीचे बारीक लक्ष असेल.
भारत ब संघात कर्णधार अभिमन्यू ईश्वरनला आघाडीवर राहून नेतृत्व करण्याची गरज आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात त्याने निराशाजनक प्रदर्शन केले होते. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध पदार्पण केलेल्या सरफराज खानला पहिल्या फेरीत त्याचा भाऊ मुशीर खानने मागे टाकले होते. त्याच्या 181 धावांच्या खेळीमुळे इंडिया ब ने इंडिया अ संघावर शानदार विजय मिळविला होता. त्यामुळे बडे भैय्या सरफराजला मोठी खेळी करून दाखवावी लागेल. सामन्यानंतर तो चेन्नईत राष्ट्रीय संघात दाखल होईल. इंडिया ब संघात वॉशिंग्टन सुंदरचाही समावेश आहे.
इंडिया क चे सलामीवीर साई सुदर्शन व ऋतुराज गायकवाड राष्ट्रीय संघात राखीव सलामीवीरच्या जागेसाठी मोठ्या खेळी करण्याचा प्रयत्न करतील. इंडिया ड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात फिरकी गोलंदाज मानव सुतारने मॅचविनिंग गोलंदाजी केली होती. तोच जोम येथे कायम राखण्याचा तो प्रयत्न करेल. इंग्लंडविरुद्ध अपयशी ठरल्यानंतर रजत पाटीदारला राष्ट्रीय संघातून डच्चू मिळाला होता. त्याला रेडबॉल क्रिकेटमध्ये धावांची भूक असल्याचे दाखवून देण्याची गरज आहे. श्रेयस अय्यर हा कसोटीसाठी दुर्लक्षित करण्यात आलेला आणखी एक खेळाडू आहे. मोठी खेळीच त्याला पुन्हा कसोटीचे दार खुले करून देऊ शकेल. असाच प्रकार देवदत्त पडिक्कल व संजू सॅमसन यांच्या बाबतीतही आहे. याशिवाय अर्शदीप सिंगलाही कसोटीत खेळण्याची क्षमता आपल्यात असल्याचे दाखवून द्यावे लागेल.









