वृत्तसंस्था/ अहमदाबाद
पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे आज रविवारी अहमदाबाद येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या क्वालिफायर-2 मध्ये आमनेसामने येतील तेव्हा पंजाब किंग्सच्या आक्रमक धोरणापुढे मुंबई इंडियन्सची कसोटी लागणार आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरकडून एकतर्फी सामन्यात आठ गड्यांनी पराभव पत्करावा लागल्याने श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सचा आत्मविश्वास काहीसा कमी झाला असेल. आता ते आयपीएलमध्ये करो किंवा मरो या परिस्थितीत आहेत आणि त्यांचे स्वप्न आयपीएलमध्ये पहिले विजेतेपद पटकावण्याचे आहे.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने एलिमिनेटरमध्ये विजेतेपदाचे संभाव्य दावेदार गुजरात टायटन्सला पराभूत करून व्यापक विजयासह सहाव्या जेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. इतिहास पाहिल्यास मुंबई इंडियन्सना आयपीएलच्या बाद फेरीचा हा मार्ग स्पर्धेत राहिलेल्या इतर दोन संघांपेक्षा चांगला परिचित आहे आणि त्यामुळे हार्दिक पंड्याच्या संघाच्या दिशेने पारडे निश्चितच झुकते. परंतु प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्यासमोर त्यांच्या संघाला संघटित ठेवण्याचे आव्हान असेल. हे काम आतापर्यंत त्यांनी चांगल्या प्रकारे केले आहे.
अय्यर-रिकी पाँटिंग जोडीसमोर त्यांच्या मागील सामन्यातील पराभव मागे टाकून पूर्ण जोर पणाला लावण्याचे आव्हान असेल. खास करून त्यांच्या गोलंदाजी विभागाला धारदार मारा करावा लागेल, जेथे अर्शदीप सिंगवर जादा दबाव आहे. मार्को जॅनेसनच्या अनुपस्थितीत आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या युजवेंद्र चहलच्या अनुपस्थितीत पंजाबला मुल्लानपूरमध्ये आरसीबीविऊद्ध दबाव आणण्यासाठी पर्यायांची शोधाशोध करावी लागली. परंतु त्याच वेळी पंजाब संघ अंतिम फेरीत पोहोचण्याची त्यांची संधी कायम आहे या विचाराने प्रेरित होऊ शकतो.
सुऊवातीच्या काही जीवदानांवर स्वार होऊन रोहित शर्माने गुजरातविरुद्ध मुंबईला कसा विजय मिळवून दिला हे पाहून पंजाबला चुकांना फारसा वाव कसा नाही हे कळून चुकेल. मुंबई इंडियन्सच्या संघात कोणतीही कमतरता नाही, त्यांनी सर्व बाजूंनी आक्रमक खेळ केला आहे. रोहित, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि पंड्या यासारख्या भारतीय खेळाडूंवर ते अवलंबून असतील. मुंबईला त्यांचे नवीन खेळाडू जॉनी बेअरस्टो आणि रिचर्ड ग्लीसन देखील गुजरातविरुद्ध कसे सहजतेने खेळले ते पाहून विशेष आनंद होईल.
नरेंद्र मोदी स्टेडियमवरील आजच्या सामन्याचा निकाल दोन्ही बाजूंचे गोलंदाज त्यांच्या योजना कशा राबवतात यावर अवलंबून असेल. कारण या मैदानावर नियमितपणे भरपूर धावा निघालेल्या आहेत. जसप्रीत बुमराहचे कारनामे आणि 20 षटकांमध्ये या भारतीय गोलंदाजाचा हुशारीने केलेला वापर ही या हंगामात मुंबईची सर्वांत मोठी ताकद राहिली आहे. बुमराहच्या अचूकतेमुळे आणि धूर्तपणामुळे फलंदाजांना त्याच्याविरुद्ध सहज धावा काढता आलेल्या नाहीत. फलंदाजीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास सूर्यकुमारच्या सातत्यात टायटन्सविऊद्ध तिलक वर्माने केलेल्या चमकदार खेळीची भर पडली आहे. पंजाबच्या दृष्टीने प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य या त्यांच्या स्फोटक सलामी जोडीने लयीत राहून खेळ करणे महत्त्वाचे असेल.
संघ-मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, बेव्हन जेकब्स, रॉबिन मिन्झ, कृष्णन श्रीजीथ, नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अश्वनी कुमार, रीस टोपले, कर्ण शर्मा, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, सत्यनारायण राजू, मुजीब उर रहमान, रघू शर्मा, जॉनी बेअरस्टो, रिचर्ड ग्लीसन, चरिथ असालंका.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, विष्णू विनोद, जोश इंग्लिस, हरनूर पन्नू, पायला अविनाश, प्रभसिमरन सिंग, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, हरप्रीत ब्रार, अजमतुल्ला ओमरझाई, प्रियांश आर्य, एरोन हार्डी, मुशिर खान, सूर्यांश शेडगे, मिच ओव्हन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, वैशाख विजयकुमार, यश ठाकूर, कुलदीप सेन, झेवियर बार्टलेट, प्रवीण दुबे, काइल जेमिसन.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.









