माटोळीत साकारला ‘वराहरूपी भगवान विष्णू’ : तीनशे वस्तूंचा समावेश.औषधी वनस्पती व इतर रानटी फळाची तीन दिवसात संग्रह

प्रतिनिधी /फोंडा
पौराणिक कथेत कथन केल्याप्रमाणे राक्षस हिरण्याक्ष यांनी जेव्हा संपूर्ण पृथ्वीला जलसागरात बुडविले होते त्यावेळी भगवान विष्णूने वराह अवतार धारण करून पृथ्वीचे कल्याण केले. त्याचप्रमाणे कोरोनापासून मानवजातीला वाचविण्यासाठी भगवान विष्णूने पुनः वराहरूपात पृथ्वीवर अवतरीत होऊन निसर्ग व जीवश्रृष्टीचे रक्षण करावे असा संदेश युवा माटोळी कलाकाराने दिला आहे. अंत्रुज महालातील केळबाय कुर्टी येथील विशांत वसंत गावडे यांनी आपल्या घरी पारंपरिक मोटोळीला कलात्मक माटोळीचे स्वरूप देत ‘वराहरूपी भगवान विष्णू’ आपल्या माटोळीतून साकारले आणि संपूर्ण गोव्याचे लक्ष वेधून घेतले.
विशेष म्हणजे कला व संस्कृती खात्याच्या राज्यस्तरीय माटोळी सजावट स्पर्धेत विशांत वसंत गावडे याला दुसरे बक्षीस प्राप्त झाले आहे. विविध प्रकारच्या साधारण तीनशे तऱहेची फळे, फुले व औषधी वनस्पतीचे संकलन करून त्याने आपल्या कलात्मक माटोळीतून ‘वराहरूपी विष्णू अवतार’ प्रतिकृती साकारलेली आहे.
कोविडकाळातही कलात्मक माटोळीत खंड पडू दिला नाही
सन 2016 सालापासून वेशांत व कुटुंबियाचा विविध प्रकारच्या कलात्मक माटोळी साकरण्याकडे कल आहे. कोविडकाळातही त्यात खंड पडू दिलेला नाही. कोरोना महामारीमुळे कला व संस्कृती खात्याचे राज्यस्तरिय स्पर्धा रद्द करण्यात आली तरीही आपण कलात्मक माटोळी साकारण्यात खंड पडू दिलेला नाही. केवळ कोरोना महामारीमुळे भटकंती जास्त प्रामणात करता आली नसल्याची खंत त्याला आहे.
विशांतच्या मागील वर्षीच्या माटोळीला प्रथम पारितोषिक
कला व संस्कृतीच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग दर्शविलेला असून त्यातही अनेक पारितोषिके प्राप्त केलेली आहे. सर्व कुटुंबियांचा हातभार लागत असल्यामुळेच मागील वर्षी कला व संस्कृती स्पर्धेत साकालेला ‘गोवर्धन श्रीकृष्ण’ माटोळील प्रथम पारितोषिक प्राप्त झाल्याचे तो अभिमानाने सागंतो. यापुर्वी त्याला राज्यस्तरिय स्पर्धेत द्वितीय, तृतीय, दोनवेळा उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त झालेली आहेत.
गणेशचतुर्थी हा निसर्गाचे नाते सांगणारा सण असून आज या माटोळी आपल्या छंदापासून दुर्मीळ असलेल्या वनस्पतीच्या प्रजाती, फळफुले राज्यातील कुठल्या परीसरात आढळतात व कोणत्या मोसमात आढळतात ही माहिती अवगत झाल्याचे तो उत्साहाने सांगतो. कोविडमुळे जास्त भटकंती करण्याकडे निर्बध असल्यामुळे ओळखीच्या जंगल परिसरातून वस्तू संग्रहीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या माटोळीत त्याने अंत्यत दुर्मिळ असे पाम झाड वनस्पती, पेड्रो हे हिरव्या रंगाच्या रानटी फळाचा समावेश आहे.
संततधार पावसामुळे रानावनातील फळफुले कमी प्रमाणात
यंदाच्या माटोळी संग्रहात एकूण 300 वस्तूंचा समावेश होता .तिसवाडी, पणजी, साखळी, कुर्टी, केरी, बांदोडा भागातून वस्तू संग्रहीत केल्या होत्या. माटोळीचे साहित्य जमविण्यासाठी आपला भाऊ प्रशांत, चुलतभाऊ ओमकार, चंदेश, करूणा, आदित्य, दक्ष, हर्षा, लगमा यांचा सर्वाधिक वाटा आहे. त्यात काही दुर्मिळ प्रजातीचाही समावेश आहे. याची जमवाजमव करताना डोंगरमाथ्यावर भटकंती ही आपली आवड असून ती कधीही थकवा देत नसून जास्तच उमेद देत असल्याचे तो सांगतो.
सरकारकडून केवळ स्पर्धेपुरती मदत मिळत असते. ज्यांना पारितोषिके प्राप्त होत नाही त्या कलात्मक माटोळी कलाकारांना प्रोत्सहन देण्यासाठी सरकारची सुटसुटीत योजना हवी. स्वतः आपल्याला मात्र सरकारकडून कोणतीही अपेक्षा नसून चतुर्थीच्या निमित्ताने आपला छंद जोपासत असल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या संग्रहातील माटोळीत वापरलेल्या वस्तूची नावे त्याच्या वनौषोधी गुणांसह भविष्यात माहिती संकलन करून ठेवण्याचा मनोदय असल्याचे शेवटी सांगितले.









